PSI चे तरूणीवर लैंगिक अत्याचार; पोलीस उपनिरीक्षकासह दोघांवर गुन्हा दाखल
बारामती : खरा पंचनामा
पोलीस भरती आणि बँड्समन भरती परीक्षेत अधिक गुण मिळवून देण्याचे आमिष दाखवून एका महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक अमरनाथ कुंभार आणि बँड पोलीस कॉन्स्टेबल मारुती करे यांच्यावर बारामती ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून या प्रकरणात तपास सुरू आहे.
यातील आरोपी पोलीस उपनिरीक्षक अमरनाथ कुंभार हे दौंड येथील राज्य राखीव पोलीस दलात (SRPF) कार्यरत आहेत, तर दुसरा आरोपी मारुती करे हा मुंबई पोलीस दलात बँड कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत आहे. या घटनेनंतर पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे. रक्षकच भक्षक झाल्याच्या संतापजनक प्रतिक्रिया येत आहेत.
आरोपींनी पीडितेचा विश्वास संपादन करून तिचे लैंगिक शोषण केल्याच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आपल्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी पीडितेने सुरुवातीला पोलिसांत धाव घेतली होती, मात्र तिथे दाद न मिळाल्याने तिने न्यायालयात याचिका दाखल केली. त्यानंतर न्यायालयाच्या आदेशानुसार दोन्ही आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) आणि अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत (अॅट्रॉसिटी) गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
गुन्ह्याचे स्वरूप गंभीर असूनही पोलीस प्रशासन आरोपींना अटक करत नसल्याचा आरोप पीडितेने केला आहे. पोलिसांनी आरोपींना तात्काळ ताब्यात न घेतल्यास पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्याचा इशारा पीडितेने दिला आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.