'अपवादात्मक परिस्थितीत पेलेट गन चालवण्याचा पोलिसांना अधिकार'; RAF च्या दारुगोळा वापराच्या नोंदी जतन करा
नवी दिल्ली : खरा पंचनामा
जंतर-मंतरवरील CJPच्या विद्यार्थी आंदोलनादरम्यान कथित पेलेट गन वापराच्या आरोपांवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी (दि. ३०) महत्त्वाचे निरीक्षण नोंदवले. अपवादात्मक परिस्थितीत पोलिसांना पेलेट गन वापरण्याचा अधिकार असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. याचवेळी केंद्र सरकारला RAFच्या दारुगोळा वापराच्या नोंदी जतन करण्याचे निर्देश देत, जखमी आंदोलकांना योग्य वैद्यकीय उपचार देण्याचे आदेश दिल्ली सरकारला दिले.
भारताचे सरन्यायाधीश सूर्य कांत, न्यायमूर्ती जॉयमल्या बागची आणि न्यायमूर्ती व्ही. मोहना यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. न्यायालयाने म्हटले की, अत्यंत हिंसक परिस्थितीत लाठीमार आणि अश्रुधूराचा वापर करूनही परिस्थिती नियंत्रणात येत नसेल, तर पोलिसांना गोळीबार करण्याची परवानगी असते. अशावेळी आंदोलन समाजकंटकांनी हिंसक वळणावर नेले असेल, तर पेलेट गन वापरण्यास पूर्णपणे मनाई कशी करता येईल, असा सवालही न्यायालयाने उपस्थित केला.
२० जुलै रोजी कथित पेलेट गनच्या गोळीबारात जखमी झालेल्या सर्व आंदोलकांना योग्य वैद्यकीय उपचार मिळाले पाहिजेत, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले. तसेच आंदोलनादरम्यान वापरलेल्या दारुगोळ्याच्या सर्व नोंदी सुरक्षित ठेवण्याचे निर्देश केंद्र सरकारला देण्यात आले.
आंदोलकांविरोधात पेलेट गनच्या वापरावर पूर्ण बंदी घालण्याची मागणी करणारे याचिकाकर्ते आणि माजी आयपीएस अधिकारी यशोवर्धन आझाद यांनाही सर्वोच्च न्यायालयाने काही प्रश्न विचारले. या प्रकरणात सर्व बाजूंचा सखोल विचार करूनच पुढील निर्णय घेतला जाईल, असे न्यायालयाने स्पष्ट केले.
केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (CRPF) अंतर्गत विश्लेषण अहवालात २० जुलै रोजी नीट पेपरफुटीविरोधी आंदोलनादरम्यान करण्यात आलेल्या पोलिस कारवाईत सर्व मानक कार्यपद्धती (SOP) पाळण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. दंगल नियंत्रणासाठी आवश्यक असलेली प्रत्येक पायरी पार पाडल्यानंतरच पेलेट गनसारख्या प्राणघातक नसलेल्या साधनांचा वापर करण्यात आल्याचे अहवालात नमूद आहे.
सीआरपीएफच्या माहितीनुसार, प्रथम सार्वजनिक घोषणा, त्यानंतर अश्रुधूर आणि लाठीमार अशा टप्प्याटप्प्याने उपाययोजना करण्यात आल्या. त्या निष्फळ ठरल्यानंतरच पंप अॅक्शन गनचा वापर करण्यात आला.
या कारवाईत धातूच्या पेलेट्समुळे सुमारे ३ ते ५ आंदोलक जखमी झाले, तर आरएएफचे ४७ जवान जखमी झाले. त्यापैकी ६ जवानांच्या डोक्याला दुखापत झाल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.