288 भारतीयांशी संपर्क नाही, तर 200 जण चीनच्या सीमेवर अडकले; नेपाळमधील महापुराने हाहाकार
नवी दिल्ली : खरा पंचनामा
नेपाळ आणि चीनच्या तिबेटमध्ये आलेल्या भीषण पूर आणि भूस्खलनामुळे मोठ्या प्रमाणावर जीवित आणि वित्तहानी झाली आहे. नेपाळमध्ये अनेक जिल्ह्यांना पुराचा फटका बसला असून, रस्ते, पूल, घरे आणि जलविद्युत प्रकल्पांचे मोठे नुकसान झाले आहे.
या आपत्तीमुळे आतापर्यंत 270 जणांचा मृत्यू झाला असून 1,688 जण अद्याप बेपत्ता असल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान नेपाळमधील पूरस्थितीवर भारत सरकारकडूनही सातत्याने लक्ष ठेवले जात आहे. परराष्ट्र मंत्रालयाने (MEA) विशेष नियंत्रण कक्ष स्थापन केला असून नेपाळमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांबाबत माहिती गोळा केली जात आहे. मंत्रालयाच्या माहितीनुसार 288 भारतीय नागरिकांशी अद्याप संपर्क होऊ शकलेला नाही.
तामिळनाडूमधील 21 भारतीय नागरिकांची सुटका करण्यात आली आहे. परराष्ट्र मंत्रालयाच्या अधिकृत प्रवक्त्यांनी ही माहिती दिली. पूर आणि भूस्खलनामुळे अनेक भागांचा संपर्क तुटल्याने यात्रेकरू आणि पर्यटकांच्या सुरक्षिततेबाबत चिंता निर्माण झाली होती.
भारत सरकारकडून नेपाळमधील संबंधित यंत्रणांशी संपर्क साधून भारतीय नागरिकांचा शोध घेण्याचे आणि त्यांना आवश्यक मदत देण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
गुरुवारी समोर आलेल्या अद्ययावत आकडेवारीनुसार नेपाळ आणि चीनच्या तिबेटमध्ये या नैसर्गिक आपत्तीमुळे आतापर्यंत 270 जणांचा मृत्यू झाला आहे तर 1,688 जण बेपत्ता आहेत.
नेपाळमध्ये 190 जणांचा मृत्यू झाला असून 1,130 जण बेपत्ता आहेत. तर चीनच्या तिबेटमध्ये तीन जणांचा मृत्यू झाला असून 558 जणांचा अद्याप शोध लागलेला नाही. बचाव आणि शोधमोहीम सुरू असल्याने मृतांचा आणि बेपत्ता नागरिकांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
या आपत्तीची सुरुवात नेपाळ-चीन सीमेच्या परिसरात झाली. त्यानंतर पुराचे पाणी वेगाने खालील भागांकडे वाहत गेले आणि अनेक जिल्ह्यांना त्याचा तडाखा बसला. वेगवान पाण्याच्या प्रवाहामुळे अनेक रस्ते आणि पूल वाहून गेले. गावांमध्ये पाणी शिरले, तर अनेक घरांचे आणि वाहनांचे नुकसान झाले. याशिवाय अनेक जलविद्युत प्रकल्पांनाही मोठा फटका बसला आहे.
आपत्तीचा नेमका विस्तार अद्याप स्पष्ट झालेला नाही. दोन्ही देशांतील प्रशासन बेपत्ता नागरिकांचा शोध घेत असून मृतांची संख्या आणि नुकसानीची आकडेवारी निश्चित करण्याचे काम सुरू आहे.
नेपाळमधील रसुवा आणि धादिंग हे जिल्हे सर्वाधिक प्रभावित भागांमध्ये आहेत. त्यानंतर पुराचे पाणी नुवाकोट, चितवन, गोरखा, तनहुन आणि नवलपरासी पूर्व या भागांकडे पोहोचले. नुवाकोटमधील देविघाट परिसरात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. रस्ते आणि इमारती उद्ध्वस्त झाल्या असून, अनेक नागरिकांना आपली घरे सोडावी लागली आहेत. पूरग्रस्त भागातील दृश्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाहने, इमारती आणि रस्ते उद्ध्वस्त झाल्याचे दिसत आहे. हे प्रभावित भाग काठमांडूपासून सुमारे 70 ते 200 किलोमीटरच्या परिसरात पसरलेले आहेत.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.