Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

'बाळूमामाच्या मेंढरांचे दर्शन घडवतो' सांगून ज्येष्ठांना लुटणारा सराईत गजाआडसांगली LCB कडून ८ गुन्हे उघड, १४ लाख ३५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

'बाळूमामाच्या मेंढरांचे दर्शन घडवतो' सांगून ज्येष्ठांना लुटणारा सराईत गजाआड
सांगली LCB कडून ८ गुन्हे उघड, १४ लाख ३५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

पूजा फडके 
सांगली : खरा पंचनामा 

ज्येष्ठ नागरिकांना दुचाकीवरून घरी सोडण्याचा बहाणा करून किंवा बाळूमामाच्या मेंढरांचे दर्शन घडवण्याच्या नादाला लावून लुटणाऱ्या मारुती बयाजी कोटे (वय ४७ वर्षे, रा. हुलजंती, ता. मंगळवेढा, जि. सोलापूर) या सराईत गुन्हेगाराला सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने (LCB) बेड्या ठोकल्या आहेत. या धडक कारवाईमुळे मिरज, जत, कवठेमहांकाळ आणि आटपाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तब्बल आठ जबरी चोरीचे गुन्हे उघडकीस आले असून, पोलिसांच्या पथकाने आरोपीकडून सोन्याचे दागिने आणि गुन्ह्यात वापरलेली दुचाकी असा एकूण १४ लाख ३५ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

ग्रामीण भागातील आठवडी बाजार किंवा बसस्थानकाच्या परिसरात फिरून असहाय्य आजी-आजोबांना हेरणे ही आरोपीची मुख्य गुन्हे करण्याची पद्धत होती. "मी पुजारी असून जवळच बाळूमामाची मेंढरे आली आहेत, तुम्हाला दर्शन घडवून घरी आणून सोडतो" असे सांगून तो वृद्धांना दुचाकीवर बसवून निर्जन ठिकाणी घेऊन जायचा. तिथे बोलण्यात गुंतवून त्यांच्या गळ्यातील सोन्याची बोरमाळ किंवा साखळी हिसकावून पळ काढायचा, तर काही वेळा वृद्धांना दारू पाजून बेशुद्ध करून त्यांची लूट करत असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.

पोलीस कोठडीदरम्यान करण्यात आलेल्या कसून तपासात आरोपीकडून १३ लाख ३५ हजार रुपये किमतीचे ९० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत, ज्यामध्ये मणीमंगळसूत्र, ५ बोरमाळ, ७ कानातील कुंडले, २ कर्णफुले, २ झुमके, साखळ्या व बुगड्यांचा समावेश आहे. तसेच गुन्ह्यात वापरलेली एक लाख रुपये किमतीची काळया रंगाची होंडा युनिकॉर्न मोटारसायकल असा एकूण १४,३५,००० रुपयांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे. आरोपीच्या अटकेमुळे मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यातील १, जत पोलीस ठाण्यातील ३, आटपाडी पोलीस ठाण्यातील ३ आणि कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यातील १ अशा आठ गंभीर गुन्ह्यांची उकल झाली आहे.

कुपवाड येथील चाणक्य चौक परिसरात आरोपी मारुती कोटे फिरत असल्याची गुप्त बातमी मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत निशाणदार यांच्या पथकाने सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. तपासादरम्यान आरोपी हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी कर्नाटक राज्यातही जबरी चोरीचे गुन्हे नोंद असल्याचे समोर आले आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक तुषार दोशी व अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजीव झाडे, सपोनि प्रशांत निशाणदार आणि एलसीबी पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.