भाजप पदाधिकाऱ्याकडे 3400 फॉर्म, 5 BLO चं तडकाफडकी निलंबन
नवी मुंबई : खरा पंचनामा
नवी मुंबईच्या खारघर परिसरात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. येथील एका झेरॉक्स सेंटरवर शेकडो एसआयआरचे फॉर्म आढळले आहेत. हे सर्व फॉर्म झेरॉक्स करण्यासाठी याठिकाणी आणले होते. मात्र हा प्रकार एका तरुणाच्या लक्षात आल्यानंतर या संपूर्ण प्रकरणाचा भांडाफोड झाला. या प्रकरणी पोलिसांनी सूरज पाटील नावाच्या भाजपच्या पदाधिकाऱ्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हा सगळा प्रकार नवी मुंबईच्या खारघर परिसरातील एका झेरॉक्स सेंटरवर उघडकीस आला आहे. इथं तब्बल ३४०० फॉर्म बेकायदेशीरपणे झेरॉक्स करण्यासाठी आणले होते. या झेरॉक्स सेंटरवर सापडलेले SIR फॉर्म हे एकूण अकरा मतदान केंद्रावरील होते. अशाप्रकारे एसआयआर फॉर्म अनधिकृतपणे स्वतःजवळ बाळगणे आणि त्यांचे झेरॉक्स काढणे, या प्रकरणी पाच बीएलओ अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यांचं तडकाफडकी निलंबन केलं आहे. खारघरमधील हा प्रकार उघडकीस आल्यानंतर विविध राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, खारघरमधील एका झेरॉक्स दुकानात हजारो 'SIR' फॉर्मची मोठ्या प्रमाणावर झेरॉक्स काढली जात असल्याची गुप्त माहिती ठाकरे गटाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांना मिळाली होती. ही बातमी समजताच ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी तेथे एक तरुण हे फॉर्म झेरॉक्स करण्यासाठी घेऊन आला होता. हा तरुण भाजपचा युवा पदाधिकारी असल्याचा दावा ठाकरे गटाकडून करण्यात आला.
ठाकरे गटाचे पदाधिकारी आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये यावरून जोरदार वाद झाला आणि त्याचे रूपांतर झटापटीत झाले. घटनेची माहिती मिळताच खारघर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणली. पोलिसांनी भाजपच्या त्या कथित पदाधिकाऱ्याला ताब्यात घेतले आणि दुकानातील सर्व 'SIR' फॉर्म जप्त करून पोलीस ठाण्यात आणले. मात्र, पोलीस ठाण्यात आणल्यानंतर काही वेळातच संबंधित भाजप पदाधिकारी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फरार झाल्याचा गंभीर आरोप ठाकरे गटाच्या नेत्यांनी केला आहे.
पोलिसांनी या प्रकरणी हजारो 'SIR' फॉर्म जप्त करून पोलीस ठाण्यात जमा केले आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणावर हे अधिकृत 'SIR' फॉर्म कोणाकडून आले, त्यांची झेरॉक्स का काढली जात होती आणि यामागे काय उद्देश होता, याचा सखोल तपास आता पोलिसांनी सुरू केला आहे. या घटनेमुळे खारघरमधील राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे.
या संपूर्ण प्रकरणावर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी एक्स अकाऊंटवर या SIR फॉर्म संदर्भातील व्हिडीओ शेअर करत भाजपवर टीका केली आहे. त्यांनी एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं की, "भाजप कार्यकर्त्याकडून ताब्यात घेतलेले हे SIR चे फॉर्म काल खारघर पोलीस ठाण्यात आणण्यात आले. त्यामुळं SIR (Special Intensive Revision) ही मोहीम केवळ भाजपाच्या मतदारांचीच नावे मतदार यादीत ठेवून विरोधी पक्षाच्या मतदारांना वगळण्याचं 'राष्ट्रीय अभियान' असल्याचं आता जगजाहीर झालंय. त्यामुळं या मोहिमेचं SIR हे नाव बदलून Special BJP Voter Confirmation (SBVC) असं ठेवायला हरकत नाही. भाजप आणि निवडणूक आयोग असं 'ताकाला जाऊन किती दिवस भांडं लपवणार?'" असा सवाल रोहित पवारांनी उपस्थित केला.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.