धनादेश अनादर प्रकरणी सांगलीत आरोपीला चार महिने कैदेची शिक्षा
व्याजासह रक्कम परत करण्याचे न्यायालयाचे आदेश
पूजा फडके
सांगली : खरा पंचनामा
उधारीच्या मालापोटी दिलेला २ लाख ४९ हजार ५९५ रुपयांचा धनादेश अनादरित (बाऊन्स) झाल्याप्रकरणी सांगली येथील अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी श्री. प्रवीण अर्जुन जगदाळे यांनी आरोपीला चार महिन्यांच्या साध्या कैदेची शिक्षा सुनावली आहे. यासोबतच न्यायालयाने आरोपीला धनादेशातील संपूर्ण रक्कम २३ जुलै २०२४ पासून प्रत्यक्ष वसूल होईपर्यंत वार्षिक ९ टक्के व्याजासह देण्याचा आदेश दिला असून, ही दंडाची रक्कम न भरल्यास अतिरिक्त दोन महिने साध्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे.
या प्रकरणाची वस्तुस्थिती अशी की, ६ मार्च २०२४ रोजी आरोपी 'न्यू बालाजी बेकर्स अँड नमकीन'चे प्रोप्रायटर ज्ञानदेव पांडुरंग पाटील यांनी फिर्यादी 'मे. कृष्णा व्हॅली कॉर्पोरेशन'कडून २,४९,५९५ रुपयांचा माल उधारीवर घेतला होता. सुरुवातीस या रक्कमेची परतफेड करण्यास आरोपीने टाळाटाळ केली आणि सरतेशेवटी फिर्यादींना वर नमूद रक्कमेचा धनादेश दिला. मात्र, सदर धनादेश बँकेत न वठता परत आला.
धनादेश बाऊन्स झाल्यानंतर फिर्यादींनी ॲड. सुयश अशोक लालवाणी यांच्यामार्फत आरोपीला कायदेशीर नोटीस पाठवली होती.
नोटीस मिळूनही आरोपीने थकीत रक्कम न दिल्याने फिर्यादींनी न्यायालयात दाद मागितली. सुनावणीदरम्यान न्यायालयात सादर करण्यात आलेले पुरावे आणि फिर्यादीचे वकील ॲड. सुयश अशोक लालवाणी व ॲड. रूपचंद सितलदास लालवाणी यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपीस दोषी ठरवत वरीलप्रमाणे शिक्षा सुनावली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.