सुनील तटकरेंना हटवण्यासाठी राष्ट्रवादीतूनच तगडी फिल्डिंग?
सुनेत्रा पवारांच्या जवळच्या नेत्याने नाव न घेता साधला निशाणा, महिला नेत्याही आक्रमक
मुंबई : खरा पंचनामा
सुनेत्रा पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अंतर्गत कलह सुरू असल्याच्या चर्चा आहेत. रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे सहकार्य करत नसल्याचे सांगत त्यांना हटवण्याची मागणी केली. मात्र, तटकरेंनी प्रशांत किशोर हे आमच्या पक्षासोबत काम करतात हे माहित नसल्याचे सांगितले. त्यामुळे सध्या तटकरे विरुद्ध इतर नेते असे काहीसे चित्र राष्ट्रवादीत झाल्याचे दिसते आहे.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विश्वासू उमेश पाटील यांनी ट्विट करत 'सुनेत्रावहिनींचे अश्रू सुकण्याआधीच पक्षाबद्दल आणि नेतृत्वाबद्दल सातत्याने संशयाचं वातावरण निर्माण करणाऱ्या बातम्या माध्यमांमध्ये पेरल्या जाऊ लागल्या. कार्यकर्त्यांच्या आणि आमदारांच्या मनात पक्षाच्या राजकीय भविष्याबद्दल संभ्रम निर्माण होईल, अशी नियोजनबद्ध चर्चा घडवून आणली जात आहे.', अशी टीका केली आहे. त्यांनी कोणाचे नाव घेतले नसले तर त्यांच्या टीकेचा रोख हा सुनील तटकरेंकडे असल्याचे बोलले जात आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी देखील सुनील तटकरेंवर निशाणा साधत त्यांनी प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा द्यावा, असे म्हटले, तसेच तटकरे आणि पटेल यांना राष्ट्रवादी काँग्रेस ताब्यात घ्यायची आहे, असा आरोप देखील केला. दरम्यान, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे म्हणाले की प्रशांत किशोर हे आमचे राजकीय सल्लागार आहेत हे मला माहित नाही मात्र, मंत्री दत्तात्रय भरणेंनी प्रशांत किशोर आमचे राजकीय सल्लागार असल्याचे विधान केले. राष्ट्रवादीतील इतर नेत्यांची वक्तव्ये ही सुनील तटकरेंच्या विरोधात असल्याचे दिसून येते.
उमेश पाटील यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, दादांवरचं प्रेम खरं होतं, तर दादांच्या माघारी त्यांच्या परिवारावरचं प्रेम कमी कसं होऊ शकतं? आदरणीय अजितदादांवर निस्सीम प्रेम करणारे हजारो कार्यकर्ते आजही आहेत. दादांनी आपल्याला काय दिलं, किती प्रेम दिलं, किती जपलं याची जाणीव ठेवून दादांच्या माघारी "दादांचा परिवार हाच आपला परिवार" या भावनेने ते निःस्वार्थपणे उभे आहेत.
दादांच्या नावावर, दादांच्या विश्वासावर आणि दादांनी दिलेल्या संधींवर आयुष्यभर मोठे झालेले काही लोक दादांच्या परिवाराला मानसिक त्रास होईल असं वातावरण निर्माण करत असतील, तर मनात एक प्रश्न निर्माण होतो.... यांचं दादांवर खरंच प्रेम होतं का? की दादा सत्तेत होते, तोपर्यंतच ते प्रेम होतं?
माझी धारणा अगदी स्पष्ट आहे. ज्याचं दादांवर खरं प्रेम होतं, त्याचं दादांच्या माघारी त्यांच्या परिवारावर तेवढंच नव्हे, तर कणभर जास्त प्रेम असायला हवं होतं. कारण दादांच्या अचानक जाण्याने केवळ महाराष्ट्राने एक नेता गमावला नाही; एका कुटुंबाचं संपूर्ण आयुष्य एका क्षणात बदललं. त्यांच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याच्या आयुष्याने अचानक वेगळं वळण घेतलं.
विशेषतः सुनेत्रा वहिनींना तर स्वतःच्या दुःखात काही काळ शांत बसण्याचीही उसंत मिळाली नाही. मनसोक्त रडायलाही वेळ मिळाला नाही... अश्रू पुसण्याआधीच पक्षाची आणि सरकारची प्रचंड जबाबदारी खांद्यावर घ्यावी लागली.
आणि अशा परिस्थितीतही त्या डगमगल्या नाहीत. दादांनी दादांनी प्रेम केलेला प्रत्येक कार्यकर्ता..... हीच आज दादांची आपल्याकडे असलेली ठेव आहे.
ती जपणं ही राजकीय सोय नाही...
ती दादांप्रती आपली निष्ठा आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.