युवकांना समजावून सांगा, आक्रमक भूमिका टाळा; सर्वोच्च न्यायालयाचे सरकारला निर्देश
नवी दिल्ली : खरा पंचनामा
"काही भरकटलेल्या युवकांनी दगडफेक केली तरी त्यांना शांत करण्याचा व समजावून सांगण्याचा प्रयत्न पोलिस आणि सुरक्षा संस्थांनी केला पाहिजे. दुसरीकडे सरकारनेदेखील आक्रमक भूमिका घेणे टाळावयास हवे," असा सल्ला सर्वोच्च न्यायालयाने केंद्र, राज्य सरकारांसह कायदा-सुव्यवस्थेची जबाबदारी असलेल्या संस्थांना आज दिला. युवकांचे म्हणणे ऐकून घेणे हे सर्वांत मोठे शस्त्र असल्याची टिप्पणीदेखील खंडपीठाने केली.
संसदेवर २० मार्च रोजी काढण्यात आलेल्या मोर्चाच्या आयोजकांवर कारवाई करण्याच्या विनंती याचिकेवरील सुनावणीवेळी सरन्यायाधीश सूर्य कांत, न्या. जॉयमल्या बागची आणि न्या. व्ही. मोहना यांच्या खंडपीठासमोर आज सुनावणी झाली.
हवाई दलातून निवृत्त झालेले माजी अधिकारी मनीष कुमार सोलंकी याबाबतची याचिका दाखल केली आहे. युवक आंदोलनाशी संबंधित अन्य याचिकांशी ही याचिका संलग्न करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. 'आंदोलक हे लोकशाहीच्या मंदिराच्या दिशेने पुढे जात होते. यामुळे त्यांचे उत्तरदायित्व निश्चित होणे आवश्यक आहे, असे याचिकेत नमूद केले आहे.
युवकांना हिंसेच्या मार्गावर जाण्यापासून रोखावे लागेल. सर्वांत चांगला मार्ग हा भरकटलेल्या युवकांना समजावून सांगण्याचा आहे. सरकारने आक्रमक भूमिका घेतली तर हिंसाचार वाढू शकतो. संयम राखत शांततापूर्ण आंदोलनाला प्रोत्साहन देण्याचे काम पोलिसांना करावे लागेल. ज्या ठिकाणी वातावरण बिघडलेले असेल तेथे स्थिती काळजीने सांभाळावी लागेल, अशी टिप्पणी सरन्यायाधीश सूर्य कांत यांनी केली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.