माईक बंद पडला, परभणीच्या मेळाव्यात शिंदेंनी भाषण सोडलं !
परभणी : खरा पंचनामा
परभणीचे खासदार संजय उर्फ बंडू जाधव यांनी आयोजित केलेल्या शेतकरी मेळाव्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना शिंदे यांचा माईक अचानक बंद पडला. बराच वेळ प्रतीक्षा केल्यानंतर माईक सुरू झाला. मात्र त्यानंतर भाषण पुढे सुरू ठेवण्याऐवजी एकनाथ शिंदे यांनी घोषणा देत भाषण आटोपतं घेतल्याचं पाहायला मिळालं.
या मेळाव्याबाबत बोलताना एकनाथ शिंदे यांनी सांगितलं की, हा शेतकरी आणि युवकांचा मेळावा असून त्याची गेल्या दोन महिन्यांपासून तयारी सुरू होती. कालपासून मराठवाड्यातील लोक या ठिकाणी आले होते. मनोज जरांगे पाटील यांनी हा मेळावा स्थगित करण्यासाठी फोन केला होता, अशी माहिती बंडू जाधव यांनी दिल्याचं शिंदे यांनी सांगितलं. यापूर्वी हा मेळावा एकदा रद्द झाला होता आणि आता तो होत असल्याचंही त्यांनी नमूद केलं.
शिंदे यांनी शेतकऱ्यांचं महत्त्व सांगताना बळीराजा हा आपला पोशिंदा, मायबाप आणि अन्नदाता असल्याचं म्हटलं. शेतकऱ्यांच्या आड कोणतंही राजकारण येता कामा नये, अशी भूमिका त्यांनी मांडली. मनोज जरांगे पाटील यांची तळमळ आपल्याला माहिती असून एक सर्वसामान्य कार्यकर्ता समाजासाठी लढत असल्याचंही शिंदे म्हणाले. आपण मुख्यमंत्री असताना दोन वेळा जरांगे पाटील यांची भेट घेतली होती, तर आता मुख्यमंत्री देवेंद्रजी आणि आपण मंत्र्यांना पाठवून कायद्यातील बाबी तपासून घेत असल्याचं त्यांनी सांगितलं.
मराठा समाज कष्टकरी असून इतर समाजाचं आरक्षण कमी न करता मराठा समाजाला देण्याची भूमिका घेतल्याचं शिंदे यांनी सांगितलं. मराठा समाजाला न्याय मिळावा, ही मागणी अनेक वर्षांपासून सुरू असल्याचं त्यांनी नमूद केलं. अण्णासाहेब पाटील यांचं आंदोलनही आपण पाहिल्याचं सांगत, 2014 मध्ये महायुतीचं सरकार आल्यानंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना आपण त्यांच्या मंत्रिमंडळात मंत्री होतो, असं शिंदे म्हणाले. कुणाचंही आरक्षण कमी न करता 12 ते 13 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय त्यावेळी सरकारने घेतल्याचं त्यांनी सांगितलं. त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन आणि उपोषण केलं, तेव्हाही त्यांची समाजासाठीची तळमळ आणि नोकऱ्यांसाठीचे प्रयत्न समजून घेतल्याचं शिंदे यांनी सांगितलं. मात्र भाषण सुरू असतानाच माईक बंद पडल्याने काही काळ व्यत्यय आला आणि माईक सुरू झाल्यानंतर शिंदे यांनी घोषणा देत आपलं भाषण संपवलं.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.