'सिल्वर ओक'वर ३ तास बंद दाराआड खलबतं !
पार्थ पवार-शरद पवारांची बैठक, महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा भूकंप?
मुंबई : खरा पंचनामा
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अजित पवार गट) खासदार पार्थ पवार यांनी अचानक राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात मोठ्या चर्चांना उधाण आले आहे. पार्थ पवार हे शरद पवार यांच्या 'सिल्वर ओक' या मुंबईतील निवासस्थानी दाखल झाले होते. दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल तीन तास बंद दाराआड बैठक पार पडली.
पार्थ पवार यांनी शरद पवार यांची भेट घेतल्याने राज्याच्या राजकारणात चर्चांना उधाण आले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी, रात्री ८ वाजण्याच्या सुमारास पार्थ पवार आणि शरद पवार यांची बैठक सुरू झाली. ही बैठक जवळपास तीन तास म्हणजे रात्री ११ वाजेपर्यंत सुरू होती. दोन राजकीय पक्षांचे प्रमुख असलेल्या आजोबा-नातवामध्ये राजकीय मुद्यावर बैठक झाली असण्याची शक्यता आहे.
या दोन्ही नेत्यांच्या भेटीचे अधिकृत कारण अद्याप स्पष्ट झालेले नसले, तरी या बैठकीने राजकीय वर्तुळात मोठा भूकंप घडवून येण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून शरद पवार गट सत्तेत सहभागी होणार असल्याची आणि दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा एकत्र येऊन (विलीनीकरण) काम करणार असल्याच्या चर्चानी जोर पकडला आहे. याच पार्श्वभूमीवर काल रात्री पार पडलेल्या या ३ तासांच्या बैठकीत विलीनीकरणाच्या संभाव्य अटी व शर्ती काय असाव्यात, यावर सविस्तर चर्चा झाल्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान, मागील काही महिन्यांपासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणाच्या चर्चा सुरू आहे. शरद पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस एनडीएमध्ये सहभागी होऊन सत्तेत जाणार असल्याची चर्चा आहे. काही दिवसांपूर्वीच शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या खासदारांनी पंतप्रधान मोदी यांची भेट घेतली होती. ही भेट मतदारसंघ आणि राज्यातील विविध प्रश्नांबाबत असल्याचे सांगण्यात आले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.