पंढरपूर कॉरिडॉरला सुब्रमण्यम स्वामींचा विरोध; फडणवीसांची भेट घेणार, कोर्टात जाण्याचा इशारा
पंढरपूर : खरा पंचनामा
महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या पंढरपूरच्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य सरकारने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळाच्या शिखर समितीच्या बैठकीत पंढरपूर कॉरिडॉरसह सुमारे 4 हजार कोटी रुपयांच्या विकास आराखड्याला मंजुरी देण्यात आली आहे. मात्र, सरकारच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला आता माजी खासदार डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांनी विरोध दर्शवला आहे.
पंढरपूर कॉरिडॉरला विरोध करण्यासाठी आपण लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याची माहिती डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांनी एका व्हिडिओच्या माध्यमातून दिली आहे. कॉरिडॉरविरोधात न्यायालयात जाण्याचे संकेतही त्यांनी दिले आहेत. त्यामुळे सरकारच्या महत्त्वाकांक्षी पंढरपूर विकास आराखड्यावरून आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
पंढरपूर कॉरिडॉरबाबत आपली भूमिका स्पष्ट करताना सुब्रमण्यम स्वामी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचे सांगितले. कॉरिडॉर थांबवण्यासाठी आवश्यक असल्यास न्यायालयात जाण्याचा इशाराही त्यांनी दिला.
यावेळी त्यांनी आक्रमक शब्दांत आपली भूमिका मांडली. "कॉरिडॉरच्या विरोधात मी कोर्टात केस केली तर त्यांचे काय हाल होतील, हे त्यांना कळेल. मी हात जोडून नमस्कार करणाऱ्यातला नाही," अशा आशयाची भूमिका स्वामी यांनी व्यक्त केली आहे.
त्यामुळे पंढरपूर कॉरिडॉरच्या मुद्द्यावरून राज्य सरकार आणि सुब्रमण्यम स्वामी यांच्यात संघर्षाची शक्यता निर्माण झाली आहे. स्वामी नेमका कोणत्या कायदेशीर मुद्द्यावर आक्षेप घेणार आहेत, याकडेही आता लक्ष लागले आहे.
पंढरपूर शहर आणि मंदिर परिसराचा पुढील अनेक दशकांचा विचार करून राज्य सरकारने मोठा विकास आराखडा तयार केला आहे. पंढरपूरला भविष्यात वाढणारी भाविकांची संख्या लक्षात घेऊन मंदिर परिसरात कॉरिडॉर उभारण्याबरोबरच शहरातील पायाभूत सुविधांमध्ये मोठ्या प्रमाणावर सुधारणा करण्याचे नियोजन आहे.
या संपूर्ण विकास आराखड्याची किंमत जवळपास ४ हजार कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. मंदिर परिसरातील गर्दीचे नियोजन, भाविकांना आवश्यक सुविधा, वाहतूक व्यवस्था, शहरातील रस्ते आणि इतर पायाभूत सुविधांचा विकास या माध्यमातून पंढरपूरचा कायापालट करण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे.
पुढील 50 वर्षांचा विचार करून नियोजन
पंढरपूरमध्ये आषाढी आणि कार्तिकी यात्रेसह वर्षभर मोठ्या संख्येने भाविक दाखल होत असतात. विशेषतः वारीच्या काळात लाखो वारकरी पंढरपुरात येतात. भविष्यात भाविकांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन पुढील 50 वर्षांचा विचार करून विकास आराखडा तयार करण्यात आला आहे.
मंदिर परिसरातील वाढती गर्दी, वाहतूक कोंडी, वारकऱ्यांसाठी आवश्यक सुविधा आणि शहरावरील वाढता ताण लक्षात घेऊन कॉरिडॉरची संकल्पना मांडण्यात आली आहे. या प्रकल्पामुळे पंढरपूरच्या धार्मिक पर्यटनाला चालना मिळण्याबरोबरच शहरातील पायाभूत सुविधाही अधिक सक्षम होतील, असा सरकारचा दावा आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.