राज ठाकरे अचानक 'वर्षा' निवासस्थानी !
मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीमागचे कारण गुलदस्त्यात
मुंबई : खरा पंचनामा
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अचानक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी 'वर्षा' या शासकीय निवासस्थानी दाखल झाले आहेत. मागील काही दिवसांपासून राज ठाकरे राज्य सरकारवर अत्यंत आक्रमकपणे टीका करत आहे. याचदरम्यान त्यांनी भल्या सकाळी अचानकपणे मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. यावेळी राज ठाकरे यांच्यासोबत मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अजिंक्य नाईक देखील सोबत असल्याची माहिती आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांची ही भेट पुर्वनियोजित होती. दोन दिवसांपूर्वीच ही भेट ठरली होती. त्यानुसार, आज सकाळी राज ठाकरे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला पोहोचले आहेत. दोन्ही नेत्यांमध्ये नेमकी काय चर्चा झाली किंवा ही भेट नेमकी कोणत्या कारणासाठी होती, याबाबतची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही.
मात्र, मागील काही दिवसांत राज ठाकरे यांनी सरकारवर अनेक गंभीर मुद्दे उपस्थित केले होते. मुंबई-गोवा महामार्गाची दुरवस्था, रस्त्यांवरील खड्डे, जेन-जी आंदोलन आणि नाशिक दौऱ्यादरम्यान कुंभमेळ्याच्या नियोजनावरून ठाकरेंनी सरकारवर थेट निशाणा साधला होता.
दरम्यान, आजची राज ठाकरे आणि फडणविसांची ही भेट दादर येथील छत्रपती शिवाजी पार्क मैदानाबाबत असण्याची शक्यता आहे.
दादर येथील ऐतिहासिक छत्रपती शिवाजी पार्क मैदानाची पुनर्रचना, क्रीडा सुविधा, मुंबईतील क्रिकेटपटूंसाठीची पायाभूत मैदाने आणि खेळाडूंचे प्रश्न यावर या बैठकीत चर्चा होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र या भेटीमागचे नेमकं कारण स्पष्टपणे समोर आलेले नाही.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.