साखरेच्या महागाईने घाम फोडला; केंद्र सरकारचे धडाधड दोन मोठे निर्णय, भाव थेट १८ टक्क्यांनी खाली !
नवी दिल्ली : खरा पंचनामा
देशात मागील काही दिवसात साखरेच्या दरात चांगलीच वाढ झाली आहे. दोन महिन्यात साखरेच्या दरात जवळपास ४० टक्क्यांची वाढ झाली. ऐन सणासुदीच्या दिवसात साखरेच्या दरात तुफान वाढ झाल्याने ग्राहकांची चिंता वाढली. तर, दुसरीकडे केंद्र सरकारही अॅक्शन मोडमध्ये आले. साखरेच्या महागाईला लगाम लावण्यासाठी केंद्र सरकारने धडाधड दोन महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. या निर्णयामुळे ग्राहकांना दिलासा मिळण्याची शक्यता असून दरात घसरण झाल्याचे दिसून आले आहे.
गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाढणाऱ्या साखरेच्या दरांवर आता ब्रेक लागल्याचे चित्र आहे. केंद्र सरकारने घेतलेल्या धडक आणि कठोर निर्णयांनंतर साखरेच्या कारखान्यातील किमतींमध्ये तब्बल १८ टक्क्यांची मोठी घसरण झाली आहे. त्यामुळे साखरेचे दर आता ६७ रुपयांवरून थेट ५५ रुपये प्रति किलोवर आले आहेत.
येत्या काही दिवसांत साखरेच्या दरात आणखी कपात होणार असल्याचा विश्वास केंद्रीय अन्न सचिव संजीव चोप्रा यांनी 'पीटीआय' सोबत बोलताना व्यक्त केला. गेल्या सुमारे १५ दिवसांत देशांतर्गत साखर बाजारात अनपेक्षित तेजी दिसून आली होती. साखरेचा एक्स-मिल दर (ज्या दराने साखर कारखाने घाऊक व्यापाऱ्याला साखर विकतो तो दर) ६७रुपये प्रति किलो या विक्रमी उच्चांकावर पोहोचला होता. अन्न सचिव संजीव चोप्रा यांनी स्पष्ट केले की, साखर कारखानदारांनी मनमानी पद्धतीने दरात केलेली वाढ हे या तेजीचे मुख्य कारण होते. कारखान्यांनी अचानक दर वाढवल्यामुळे घाऊक आणि किरकोळ बाजारात साखरेचे भाव भडकले असल्याचे त्यांनी सांगितले.
साखरेचे दर ६७ रुपये प्रति किलोवर पोहोचताच केंद्र सरकारने तातडीने सूत्रे हलवून दोन अत्यंत महत्त्वाचे निर्णय घेतले. देशांतर्गत बाजारात साखरेचा पुरवठा मजबूत करण्यासाठी सरकारने साखरेच्या आयातीला हिरवा कंदील दिला. परदेशातून साखर येण्याचा मार्ग मोकळा झाल्यामुळे बाजारातील तुटवड्याची भीती पूर्णपणे संपली आहे.
साखरेची सट्टेबाजी आणि बेकायदेशीर साठेबाजी करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा सरकारने दिला. साठेबाजी रोखण्यासाठी कडक पाळत आणि निर्बंध लादण्यात आले. त्याशिवाय आता, आयातीमुळे बाजारात साखरेचा पुरवठा वाढणार असल्याने साठेखोरांचे धाबे आणखी दणाणर आहेत.
सरकारच्या या आक्रमक पावलांचा सकारात्मक परिणाम बाजारात त्वरित दिसून आला. साखर कारखान्यांना आपले दर कमी करणे भाग पडले. परिणामी, ६७ रुपये प्रति किलोवर पोहोचलेला एक्स-मिल दर आता १८ टक्क्यांनी घसरून ५५ रुपये प्रति किलोवर आला आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.