Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

आयएएस अधिकारी दिव्या मित्तल यांचा राजीनामा

आयएएस अधिकारी दिव्या मित्तल यांचा राजीनामा

लखनऊ : खरा पंचनामा 

उत्तर प्रदेश कॅडरच्या आयएएस अधिकारी दिव्या मित्तल यांनी आपल्या पदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. राजीनाम्यानंतर त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वर एक भावनिक संदेश लिहून आपल्या १३ वर्षांच्या प्रशासकीय प्रवासाच्या आठवणींना उजाळा दिला.

IIT आणि IIMमधून शिक्षण पूर्ण केल्यानंतर लंडनमध्ये नोकरी करणाऱ्या दिव्य मित्तल यांनी भारतात परतत नागरी सेवा परीक्षेची तयारी केली आणि १३ वर्षांपूर्वी त्यांची आयएएस अधिकारी म्हणून निवड झाली.

आपल्या राजीनाम्याबाबत लिहिताना दिव्या मित्तल यांनी सांगितले की, त्यांनी स्वतःच्या इच्छेने हा निर्णय घेतला आहे. गेली १३ वर्षे त्यांच्यासाठी अविस्मरणीय ठरली. साध्या वातावरणात वाढताना त्यांनी दिवस-रात्र मेहनत करून IIT दिल्ली आणि IIM बेंगळुरू येथून शिक्षण घेतले. त्यानंतर त्यांनी लंडनमध्ये नोकरी केली. मात्र, आपण ज्या भारताचे स्वप्न पाहिले होते, तो भारत घडविणाऱ्या प्रत्येक वीटेवर आपल्या हाताचे ठसे असावेत, अशी त्यांची इच्छा होती. त्यामुळे त्या भारतात परतल्या आणि नागरी सेवा परीक्षेत यश मिळवत IAS अधिकारी होण्याचा मान त्यांना मिळाला.

आपल्या प्रशासकीय कार्यकाळाचा उल्लेख करताना त्यांनी म्हटले की, या काळात खूप काही करण्याची संधी मिळाली आणि त्यातून अनेक गोष्टी शिकता आल्या. देवरियाने योग्याच्या बाजूने उभे राहणे हा पर्याय नसून कर्तव्य असल्याचे शिकवले.

मिर्झापूरने 'अशक्य' ही वस्तुस्थिती नसून केवळ एक मत असल्याची जाणीव करून दिली. तसेच माँ विंध्यवासिनीच्या चरणी बसून शक्ती कोणत्याही पदातून येत नाही, तर त्यांच्या कृपेने आणि लोकांच्या विश्वासातून मिळते, हे शिकायला मिळाले, असे त्यांनी नमूद केले.

स्वतःसाठी पाहिलेली स्वप्ने पूर्ण झाली होती; मात्र आता आपल्या लोकांसाठी पाहिलेली स्वप्ने जगण्याची वेळ आली, हीच आपल्या प्रवासातील सर्वांत मोठी शिकवण असल्याचे दिव्या मित्तल यांनी सांगितले. या सेवेत खरा आनंद त्या डोळ्यांमध्ये दिसला, ज्या कुटुंबाला पहिल्यांदाच जमिनीचा हक्क मिळाला, ज्या दिव्यांग व्यक्तीला सन्मानाने जगण्याची संधी मिळाली आणि ज्या शेतकऱ्याच्या शेतात पाणी पोहोचले. लोकांच्या संघर्षात त्यांच्यासोबत चालताना प्रत्येक सरकारी फाईलमागे एक व्यक्ती असते आणि त्या व्यक्तीची प्रतिष्ठा जपणे हाच न्याय आहे, हे शिकल्याचेही त्यांनी लिहिले.

आपल्या यशाचे आणि या प्रवासाचे श्रेय देताना दिव्या मित्तल यांनी लोकांच्या प्रेमाचा आणि विश्वासाचा विशेष उल्लेख केला. त्या म्हणाल्या की, लोक त्यांच्या आनंदात त्यांच्यापेक्षाही अधिक आनंदी झाले. त्या स्वतः थकलेल्या किंवा खचलेल्या असतानाही लोकांनी त्यांच्याकडे त्याच विश्वासाने पाहिले. या विश्वासामुळे पुढे जात राहण्याचे बळ मिळाले. लोकांकडून इतके प्रेम, सन्मान आणि आपलेपणा मिळाला की आपली झोळी पूर्ण भरून गेली, अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली.

या प्रवासात त्यांच्या सोबत खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या सहकाऱ्यांचे, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचेही मोठे योगदान असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या सर्वांनी प्रत्येक टप्प्यावर त्यांच्यासोबत काम केले आणि ठामपणे साथ दिली, असे त्यांनी नमूद केले.

आपल्या संदेशाच्या अखेरीस दिव्या मित्तल अत्यंत भावूक झाल्या. त्यांनी लहुरिया दहच्या डोंगरावरील एका वृद्ध महिलेची आठवण सांगितली. आपल्या गावात पहिल्यांदाच पाणी पोहोचल्याचे पाहिल्यानंतर त्या वृद्ध महिलेने काहीही न बोलता केवळ थरथरत्या हातांनी दिव्या मित्तल यांच्या डोक्यावर हात ठेवून त्यांना आशीर्वाद दिला होता. आज पद सोडले असले तरी त्या वृद्ध मातेचा स्पर्श आयुष्यभर विसरता येणार नाही, असे त्यांनी म्हटले. तसेच देशाच्या मातीने दिलेले स्वप्नही कधीही विसरणार नसल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.