Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

'भारतात एकही मुस्लीम नको' असे हिंदूला वाटत असेल तर तो हिंदू नाही; मोहन भागवतांचं मोठं वक्तव्य

'भारतात एकही मुस्लीम नको' असे हिंदूला वाटत असेल तर तो हिंदू नाही; मोहन भागवतांचं मोठं वक्तव्य

दिल्ली/ न्यूयॉर्क : खरा पंचनामा 

न्यूयॉर्कमध्ये आयोजित करण्यात आलेल्या 'वन वर्ल्ड, वन ह्युमॅनिटी' या धर्मगुरूंच्या परिषदेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी हिंदुत्व, मानवता आणि विविधतेबाबत आपली भूमिका मांडली.

यावेळी त्यांनी 2018 मध्ये मुस्लिम समुदायातील काही सदस्यांसोबत झालेल्या संवादाचा संदर्भ देत हिंदू राष्ट्राच्या संकल्पनेत मुस्लिमांना वगळलेले नसल्याचे स्पष्ट केले.

मोहन भागवत यांनी सांगितले की, 2018 मध्ये मुस्लिम बांधवांसोबत झालेल्या चर्चेदरम्यान त्यांना हिंदू राष्ट्राच्या संकल्पनेबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. 'तुम्ही हिंदू संघटना आहात आणि हिंदू राष्ट्राची संकल्पना मांडता, मग मुस्लिमांचे काय? आम्हाला भारतातून बाहेर काढणार का?' असा सवाल त्यांना करण्यात आला होता.

या प्रश्नाला उत्तर देताना आपण 'हे हिंदुत्व नाही', असे स्पष्ट केल्याचे भागवत यांनी सांगितले. त्याच संदर्भात त्यांनी म्हटले की, जर एखाद्या हिंदूला भारतात एकही मुस्लीम व्यक्ती नको, असे वाटत असेल तर तो हिंदू नाही. जर तुम्हाला स्वतःला हिंदू म्हणायचे असेल, तर तुम्हाला विश्वास ठेवावा लागेल की सर्व मार्ग एकाच ध्येयाकडे नेतात आणि प्रत्येक मानवाची प्रतिष्ठा आहे.

भागवत यांनी पुढे मानवतेतील समानतेवर भर दिला. त्यांच्या मते, प्रत्येक व्यक्तीला समान प्रतिष्ठा आहे आणि धर्माच्या आधारावर माणसांमध्ये भेद करता कामा नये. वेगवेगळे मार्ग असले तरी त्यांचा अंतिम उद्देश सत्याचा शोध हा असतो, अशी भूमिका त्यांनी मांडली.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विश्वास आहे की, संपूर्ण मानवजात एकच आहे. धर्म, संस्कृती आणि इतर बाबतीत आपल्यात विविधता दिसत असली, तरी माणूस म्हणून आपण सर्व एक आहोत. हा एकतेचा संदेश जगभर पोहोचवणे हे आपले कर्तव्य आहे. विविधता हीच आपल्या एकतेची ओळख असून तिचा स्वीकार करणे, सन्मान राखणे आणि ती जपणे आवश्यक आहे," असे मोहन भागवत म्हणाले.

मी धर्मगुरू नाही आणि तुमच्याप्रमाणे धार्मिक विद्वानही नाही. मात्र, मी अशा समाजात कार्य करतो, जिथे धर्मांच्या वाटा वेगवेगळ्या असल्या तरी मानवता एकच असल्याची धारणा आहे. सत्य एकच आहे आणि मानवता ही त्यातूनच निर्माण होते. त्यामुळे मानवतेचे मूळही एकच आहे; मात्र प्रत्येकजण आपल्या विचारसरणी आणि दृष्टिकोनानुसार त्याचे वेगवेगळ्या प्रकारे वर्णन करतो. कारण प्रत्येक व्यक्ती आपल्या मनात तयार झालेल्या विचारांच्या चौकटीतून जगाकडे पाहत असतो," असे सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले.

भारताच्या धार्मिक परंपरेचा उल्लेख करताना भागवत यांनी देशाने इतिहासात विविध धर्म आणि पंथांच्या लोकांना आश्रय दिल्याचे सांगितले. परकीय आक्रमणांमुळे भारताने अनेक गोष्टी गमावल्या, मात्र समाजाची मूलभूत परंपरा टिकून राहिल्याचे त्यांनी नमूद केले. मानवतेतील एकत्व आणि विविधतेचा स्वीकार हा भारताच्या परंपरेतील महत्त्वाचा संदेश असल्याचे सांगत त्यांनी 'एक जग, एक मानवता' या विचाराचा प्रसार करण्याची गरज व्यक्त केली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.