Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

कर्णकर्कश्श, फटाक्यासारखे आवाज काढणाऱ्या २२९ दुचाकींच्या मॉडीफाय सायलेन्सरवर फिरवला बुलडोझरसांगली वाहतूक शाखेची कारवाई पहा व्हिडीओ

कर्णकर्कश्श, फटाक्यासारखे आवाज काढणाऱ्या २२९ दुचाकींच्या मॉडीफाय सायलेन्सरवर फिरवला बुलडोझर
सांगली वाहतूक शाखेची कारवाई 
पहा व्हिडीओ 

सांगली : खरा पंचनामा 

सांगली, मिरज शहरात कर्णकर्कश्श तसेच फटाक्यासारखे आवाज काढणाऱ्या २२९ दुचाकींच्या (बुलेट) मॉडीफाय सायलेन्सरवर पोलिसांनी शुक्रवारी बुलडोझर फिरवून ते निकामी केले. आता दुचाकी चालवणाऱ्या अल्पवयीन मुलांच्या पालकांवर कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे.

सांगलीसह मिरजेत गेल्या काही दिवसांपासून बुलेटसह इतर दुचाकी वाहनांचे सायलेन्सर बदलून कर्णकर्कश्श आवाज काढणाऱ्यांचे प्रमाण वाढले होते. फटाके फोडल्यासारखे आवाज काढून सुसाट वेगाने दुचाकी पळवणाऱ्या बेदरकार दुचाकीस्वारांमुळे ज्येष्ठ नागरिक, रूग्ण, लहान मुले तसेच रस्त्यावरून जाणाऱ्या इतर वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत होता. त्यामुळे सांगली वाहतूक शाखेचे निरीक्षक अजय सिंदकर, विश्रामबाग पोलीस ठाणे, मिरज वाहतूक शाखेचे सहायक निरीक्षक रणजीत तिप्पे यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी दि. ३ ऑगस्टपासून विशेष मोहिम राबवली. 


या मोहिमेत सांगली-मिरजेत मॉडीफाय केलेले २२९ सायलेन्सर जप्त करण्यात आले. आरटीओ कार्यालयाच्या परवानगीशिवाय वाहनांमध्ये बदल करून हे सायलेन्सर बसवण्यात आले होते. पोलिसांनी संबंधित वाहन चालकांवर कारवाई करताना हे सायलेन्सर जप्त करून अधिकृत सायलेन्सर बसवण्यास भाग पाडले.

पोलिसांनी जप्त केलेले २२९ सायलेन्सर शुक्रवारी पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या आवारात नष्ट करण्यासाठी पसरून ठेवण्यात आले होते. अधीक्षक तुषार दोशी, अप्पर अधीक्षक कल्पना बारवकर, उपअधीक्षक अजय कोकाटे, निरीक्षक सिंदकर, सहायक निरीक्षक तिप्पे आदींच्या उपस्थितीत या सायलेन्सरवर बुलडोझर फिरवून ते निकामी करण्यात आले. कंपनीच्या अधिकृत सायलेन्सरशिवाय बेकायदेशीर बदल करून सायलेन्सर बसवल्यास यापुढेही तीव्र कारवाई करण्याचा इशारा पोलिसांनी दिला.

आता दुचाकी चालवणाऱ्या अल्पवयीन मुलांच्या पालकांवर कारवाई : अधीक्षक दोशी 
कर्णकर्कश्श आवाजात दुचाकी पळवून त्रासदायक ठरणाऱ्या वाहनांवर सांगली-मिरजेत कारवाईचा बडगा उगारण्यात आला. यापुढेही कारवाई सुरू राहणार आहे. तसेच अल्पवयीन पाल्यांना दुचाकी देणाऱ्या पालकांवर कारवाई केली जाणार आहे. नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन करून पोलिसांना सहकार्य करणे अपेक्षित आहे, असे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी यावेळी सांगितले.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.