तासगावमधील रुग्णालयातून नवजात बालकाचे अपहरण करणाऱ्या परिचारिकेला सात वर्षे सश्रम कारावास;
सांगली न्यायालयाचा निकाल
पूजा फडके
सांगली : खरा पंचनामा
तासगाव येथील सरस्वती आनंद हॉस्पिटलमधून अवघ्या काही तासांच्या नवजात बालकाचे अपहरण करणाऱ्या स्वाती छबुराव माने उर्फ लक्ष्मी मच्छींद्र पवार (वय ३८, रा. रामानंदनगर, किर्लोस्करवाडी, ता. पलूस) या परिचारिकेला सांगलीच्या जिल्हा व सत्र न्यायालयाने दोषी ठरवले आहे. या गुन्ह्यासाठी तिला सात वर्षे सश्रम कारावास आणि तीन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली असून, दंड न भरल्यास दोन महिन्यांची साधी कैद भोगावी लागेल. याशिवाय, जुवेनाईल जस्टिस ॲक्ट २०१५ च्या कलम ७५ नुसार तिला तीन वर्षे सश्रम कारावासाची शिक्षाही देण्यात आली आहे. जिल्हा व सत्र न्यायाधीश क्र. १ व्ही. डी. निंबाळकर यांच्या न्यायालयाने हा महत्त्वपूर्ण निकाल दिला.
ही घटना २२ जुलै २०२२ रोजी घडली होती. एका गरोदर महिलेला बाळंतपणासाठी तासगावमधील सरस्वती आनंद हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. दुसऱ्या दिवशी, २३ जुलै २०२२ रोजी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास तिने मुलाला जन्म दिला. त्याच रुग्णालयात आरोपी महिला परिचारिका म्हणून काम करत होती. बाळाची काळजी घेण्याचे आणि त्याला डॉक्टरांना दाखवण्याचे भासवून आरोपी परिचारिकेने नवजात बालकाला पिशवीत भरून पळवून नेले. बाळाच्या नातेवाईकांनी रुग्णालयात शोध घेतला असता बाळ व परिचारिका दोघेही मिळून आले नाहीत. त्यानंतर बाळाच्या आजीने तासगाव पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली.
तक्रार दाखल होताच तासगाव पोलिसांनी तातडीने तपास चक्र फिरवली. रुग्णालयासमोरील मेडिकल स्टोअरचे सीसीटीव्ही फुटेज तपासले असता आरोपी महिला पिशवीतून काहीतरी घेऊन जाताना दिसली. त्यानंतर ती एका ॲपे रिक्षातून निघून गेल्याचे समोर आले. पोलिसांनी रिक्षाचालकाचा शोध घेतला असता, त्याने महिलेच्या हातातील पिशवीतून बाळ रडत असल्याचा आवाज येत असल्याचे सांगितले. पोलिसांनी तत्काळ रिक्षाचालकाला सोबत घेऊन शोधमोहीम राबवून आरोपीच्या घरावर छापा टाकला. तेथे आरोपी महिला तिच्या नवऱ्यासह आणि अपहृत बालकासह आढळून आली.
बालकाच्या पायावर बांधलेला टॅग आणि चिकटपट्टी तपासली असता त्यावर बाळाच्या आईचे नाव, डॉक्टरांचे नाव तसेच जन्मतारीख व वेळ नोंदवलेली आढळली. यावरून आरोपीने सरस्वती आनंद नर्सिंग होममधूनच बाळाचे अपहरण केल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन बाळाला सुरक्षितपणे पालकांच्या स्वाधीन केले.
वैद्यकीय तपासासाठी बाळाचे तसेच आई-वडिलांचे रक्ताचे नमुने कोल्हापूर येथील न्यायवैद्यकीय प्रयोगशाळेत (FSL) डीएनए चाचणीसाठी पाठवण्यात आले होते. या चाचणीच्या अहवालात ते बाळ संबंधित दांपत्याचेच असल्याचे सिद्ध झाले. या प्रकरणाचा सखोल तपास करून पोलीस उपनिरीक्षक एस. एन. गुरुव यांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.
न्यायालयीन कामकाजादरम्यान सरकारी पक्षातर्फे एकूण १७ साक्षीदार तपासण्यात आले. यामध्ये बाळाची आई, आजी, डॉ. अंजलि विश्वनाथ पाटील, रिक्षाचालक आणि सीसीटीव्ही फुटेजच्या पंचांची साक्ष निर्णायक ठरली. अतिरिक्त सरकारी अभियोक्ता माधव कुलकर्णी व आरती आनंद देशपांडे (सातविलकर) यांनी न्यायालयात बाजू मांडली. आरोपीने पूर्वनियोजित कट रचून रुग्णालयात नोकरी मिळवली आणि नवजात बालकाचे अपहरण करून त्याच्या जीवाला धोका निर्माण केला, असा युक्तिवाद सरकारी पक्षाने केला.
न्यायालयाने सर्व पुरावे व युक्तिवाद ग्राह्य धरून आरोपीला ही कठोर शिक्षा सुनावली. या तपासात तासगाव पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार रवींद्र माळकर, उदय गाडे, सुधीर पाटील आणि पैरवी कक्षाच्या पोलीस अंमलदार सुनिता आवळे यांनी सहकार्य केले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.