Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

शेहजाद पूनावालांनी दिला भाजपच्या सर्व पदांचा पुन्हा एकदा राजीनामा

शेहजाद पूनावालांनी दिला भाजपच्या सर्व पदांचा पुन्हा एकदा राजीनामा

दिल्ली : खरा पंचनामा 

भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते शेहजाद पूनावाला यांनी पक्षाच्या सर्व पदांसह प्राथमिक सदस्यत्वाचा पुन्हा एकदा राजीनामा दिला आहे. यापूर्वी दिलेला राजीनामा पक्षाने फेटाळला होता; मात्र यावेळी आपला राजीनामा स्वीकारावा, अशी विनंती त्यांनी पक्षाकडे केली आहे.

'एक्स' वरील एका पोस्टद्वारे पूनावाला यांनी ही माहिती दिली. त्यांनी भाजपचे कार्यकारी अध्यक्ष नितीन नबीन यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला आहे. यासोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, जे. पी. नड्डा आणि बी. एल. संतोष या वरिष्ठ नेत्यांचे मार्गदर्शन व सहकार्याबद्दल त्यांनी आभार मानले आहेत.

भाजप आणि संघ परिवाराने दिलेल्या संधीबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना पूनावाला म्हणाले, "माझ्यासारख्या एका तरुण, सामान्य कुटुंबातील मुस्लिम आणि राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या व्यक्तीला संधी मिळणे केवळ भाजप आणि या देशातच शक्य होते."

३० जुलै २०२६ रोजी पाठवलेल्या पत्राचा उल्लेख करत पूनावाला यांनी सांगितले की, "वैयक्तिक आणि आर्थिक अडचणींमुळे मी पक्षाचे प्राथमिक सदस्यत्व व पदांचा बिनशर्त राजीनामा दिला होता. पक्षाने तो तात्काळ न स्वीकारता मला पुनर्विचार करण्याची विनंती केली, याबद्दल मी आभारी आहे. मात्र, दीर्घ विचारमंथनानंतर मी राष्ट्रीय प्रवक्तेपद आणि सदस्यत्वातून मुक्त होण्याच्या निर्णयावर ठाम आहे." काही व्यक्तींशी संबंधित अलीकडील घडामोडींमुळे माझ्या या निर्णयाला अधिक बळ मिळाले, असेही त्यांनी नमूद केले.

आर्थिक व कौटुंबिक परिस्थितीमुळे आपण आता खाजगी क्षेत्रात काम करणार असल्याचे पूनावाला यांनी स्पष्ट केले. "मी फक्त पक्षाची 'व्यवस्था' सोडत आहे, पक्षाचे 'विचार' किंवा 'व्यक्ती' नाही. शक्य असेल तिथे मी भाजप आणि पंतप्रधान मोदी यांच्या व्हिजनला पाठिंबा देत राहीन," असेही पुनावाला यांनी स्पष्ट केले आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.