ड्रायव्हरकडे एवढा पैसा कुठून आला?
विनायक मेटेंच्या मृत्यूवर चार वर्षानंतरही ज्योती मेटेंचा संशय
बीड : खरा पंचनामा
शिवसंग्रामचे संस्थापक आणि माजी आमदार विनायक मेटे यांच्या अपघाती निधनाला चार वर्षे पूर्ण झाली असली, तरी त्यांच्या मृत्यूभोवतीचे प्रश्न अद्याप कायम आहेत. बीड येथील स्मृतीस्थळावर चौथ्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यासाठी आलेल्या त्यांच्या पत्नी डॉ. ज्योती मेटे यांनी अपघात प्रकरणातील न्यायालयीन विलंबावर तीव्र नाराजी व्यक्त केली. तसेच अपघातातील चालकाच्या भूमिकेबाबत सुरुवातीपासूनच संशय असल्याचे त्यांनी पुन्हा एकदा सांगितले.
डॉ. ज्योती मेटे यांनी सांगितले की, अपघातातील चालक एकनाथ कदम याच्यावर आमचा सुरुवातीपासूनच संशय आहे. मात्र, या प्रकरणातील न्यायालयीन प्रक्रिया अद्याप पुढे सरकलेली नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
आरोपी प्रत्येक सुनावणीच्या तारखेला न्यायालयात वारंवार गैरहजर राहत असल्याचा दावा केला, त्यामुळे अद्याप आरोप निश्चितीची म्हणजेच 'चार्ज फ्रेम'ची प्रक्रिया झालेली नसल्याचे त्यांनी सांगितले. चार वर्षांचा कालावधी उलटूनही प्रकरणात ठोस प्रगती होत नसल्याने त्यांनी न्यायव्यवस्थेतील विलंबावर प्रश्न उपस्थित केला.
विनायक मेटे यांच्या निधनामुळे कुटुंबाने मोठी हानी सोसली असून, त्यांच्या जाण्याने संपूर्ण भविष्य उद्ध्वस्त झाल्याची भावना ज्योती मेटे यांनी व्यक्त केली. मात्र, या प्रकरणाकडे सातत्याने दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. न्याय मिळण्यासाठी कुटुंबीयांकडून सातत्याने पाठपुरावा केला जात असतानाही प्रकरणाची सुनावणी अपेक्षित वेगाने होत नसल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
डॉ. ज्योती मेटे यांनी अपघातातील चालकाच्या सध्याच्या सामाजिक आणि आर्थिक स्थितीवरही प्रश्न उपस्थित केले. संबंधित चालक आजही सामाजिक जीवनात सक्रियपणे वावरत असल्याचा दावा त्यांनी केला.
त्याच्याकडे आलिशान गाड्या असून बैलगाडा शर्यतींसारख्या महागड्या छंदांसाठी पैसा कुठून येतो, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. या आर्थिक व्यवहारांची आणि त्याच्या पाठीमागे कोण आहे? याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. मात्र, चालकाच्या आर्थिक स्थितीबाबत केलेले आरोप हे ज्योती मेटे यांनी उपस्थित केलेले प्रश्न असून, त्यांची स्वतंत्रपणे पडताळणी होणे आवश्यक आहे.
या संपूर्ण प्रकरणामागे काही 'अदृश्य हात' आहेत का, याची चौकशी करण्याची मागणी ज्योती मेटे यांनी केली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.