४०० लिटर हातभट्टीचे दारूचे रसायन जागेवरच केले उद्ध्वस्त
सांगलीत एलसीबीची कारवाई
पूजा फडके
सांगली : खरा पंचनामा
सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी आणि अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने (LCB) अवैध हातभट्टी दारू तयार करणाऱ्यांवर मोठी कारवाई केली आहे. माधवनगर ते कर्नाळ रस्त्यावरील सिमेंट आणि अन्न प्रक्रिया कारखान्यामागील ओढ्यालगत चालणाऱ्या गावठी हातभट्टीवर धाड टाकून पोलिसांनी कारवाई केली.
स्थानिक गुन्हे शाखेचे पथक माधवनगर परिसरात गस्तीवर असताना पोलीस अंमलदार विक्रम खोत यांना गोपनीय माहिती मिळाली की, ओढ्यालगत जमिनीमध्ये लोखंडी बॅरेल पुरून हातभट्टीची दारू तयार केली जात आहे. पोलीस पथक घटनास्थळी पोहोचताच संशयित आरोपी अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले. परिसरात पाहणी केली असता तीव्र दर्प येत असल्याने बारकाईने शोध घेण्यात आला. यावेळी जमिनीत गाडलेल्या लोखंडी बॅरल्समध्ये ४०० लिटर कच्चे रसायन आणि इतर साहित्य असा एकूण १७,७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
सदर रसायन मानवी आरोग्यास धोकादायक असल्याने पोलिसांनी नमुने काढून उर्वरित सर्व मुद्देमाल जागेवरच उद्ध्वस्त केला. या प्रकरणी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पसार झालेले आरोपी महाराज कुंभार मारवाडी आणि काल्या कुंभार मारवाडी (दोघे रा. कंझारभाट वस्ती, कर्नाळ) यांचा शोध सुरू आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने पार पाडली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.