Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

कोठडीत मोबाईल अन् ८०-९० अश्लील व्हिडीओ; प्रज्वल रेवण्णाचा जेलमध्ये नवा कारनामा, गुन्हा दाखल

कोठडीत मोबाईल अन् ८०-९० अश्लील व्हिडीओ; प्रज्वल रेवण्णाचा जेलमध्ये नवा कारनामा, गुन्हा दाखल

बंगळुरू : खरा पंचनामा 

बलात्कार प्रकरणात तुरुंगात असणारा जनता दल (सेक्युलर) चा माजी खासदार प्रज्वल रेवण्णा पुन्हा एकदा नव्या वादात सापडला आहे. बंगळुरू येथील 'परप्पना अग्रहारा' मध्यवर्ती कारागृहात अलिकडेच झाडाझडती घेण्यात आली.

यावेळी रेवण्णाच्या कोठडीतून जप्त करण्यात आलेल्या मोबाईल फोनमध्ये सुमारे ८० ते ९० अश्लील व्हिडीओ आढळून आल्याची माहिती मध्यवर्ती गुन्हे शाखेच्या सूत्रांनी दिली आहे. व्हीआयपी आणि हाय-प्रोफाईल कैद्यांवर लक्ष ठेवण्यासाठी कारागृहात विशेष तपासणी मोहीम राबवण्यात आली, यावेळी रेवण्णाच्या कोठडीतून मोबाईल फोन जप्त करण्यात आला.

रेवण्णाकडून जप्त केलेल्या मोबाईलमध्ये ८० ते ९० डाऊनलोड केलेले पॉर्न व्हिडीओ सापडले. यात भारतीय अश्लील कंटेटचा समावेश असल्याचे सूत्रांनी म्हटले आहे. याशिवाय, अश्लील चित्रं व विवस्त्र महिलांचे छायाचित्रं असलेली वर्तमानपत्रातील कात्रणेही आढळून आली. जप्त करण्यात आलेला फोन फॉरेन्सिक विश्लेषणासाठी पाठवण्यात आला आहे. फोनमधील व्हिडीओ, फोटो आणि इतर डिजिटल डेटा कधी आणि कसा डाऊनलोड केला? तसेच चालू असलेल्या गुन्हेगारी प्रकरणांशी याचा काही संबंध आहे का? याचा तपास केला जात आहे.

दरम्यान, या प्रकारानंतर कारागृह प्रशासनात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी कारागृहाच्या साहाय्यक अधीक्षकांना निलंबित करण्यात आले असून, बंगळुरू मध्यवर्ती कारागृहाच्या अधीक्षकांना कारणे दाखवा नोटीस बजवण्यात आली आहे. चार ते पाच तास चाललेल्या या शोधमोहिमेदरम्यान मोबाईल फोनव्यतिरिक्त एक पेनड्राइव्ह आणि चार्जरही जप्त करण्यात आला. या कारवाईनंतर कारागृह प्रशासनाने रेवण्णाविरोधात नवा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात आणखी एका कैद्याच्या नावाचा समावेश आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच कर्नाटक उच्च न्यायालयाने बलात्कार प्रकरणात रेवण्णाची जन्मठेपेची शिक्षा स्थगित करण्याची आणि अंतरिम जामीन देण्याची याचिका फेटाळली होती. गुन्ह्याचे गांभीर्य आणि लैंगिक शोषणाचे अनेक खटले प्रलंबित असल्याचे नमूद करत न्यायालयाने त्याला दिलासा देण्यास नकार दिला. तसेच तो बाहेर आल्यास साक्षीदारांवर आणि प्रलंबित खटल्यांवर दबाव येऊ शकतो, अशी भीती न्यायालयाने व्यक्त केली. लैंगिक शोषण, अश्लील चित्रीकरण आणि पुरावे नष्ट केल्याप्रकरणी विशेष न्यायालयाने प्रज्वल रेवण्णाला ऑगस्ट २०२५ मध्ये दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी त्याच्याशी संबंधित कथित आक्षेपार्ह व्हिडिओ समोर आल्यानंतर हे प्रकरण देशभर गाजले होते.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.