HSRP नंबर प्लेट अजूनही लावली नाही? आता परिवहन विभागाकडून होणार कारवाई
मुंबई : खरा पंचनामा
हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट न बसवणाऱ्या वाहनधारकांबाबत आता परिवहन विभागाने अत्यंत कडक भूमिका घेतली आहे. आतापर्यंत वेळोवेळी दिलेल्या मुदतीनंतरही कोट्यवधी वाहनधारकांनी HSRP नंबर प्लेट लावली नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आता परिवहन विभागाकडून अशा बेजबाबदार वाहनधारकांवर कारवाईचा फास आवळला जाणार असून, यासाठी विशेष पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, परिवहन विभागाकडे आतापर्यंत राज्यातील एकूण 1 कोटी 10 लाख 84 हजार वाहनधारकांनी हाय सिक्युरिटी नंबर प्लेटसाठी नोंदणी केली आहे. यापैकी 98 लाख 08 हजार लोकांनी आपल्या वाहनांवर यशस्वीरीत्या नंबर प्लेट लावून घेतल्याची माहिती परिवहन विभागाने दिली आहे.
मात्र, या आकडेवारीच्या पलिकडे अजूनही राज्यातील 1 कोटींहून अधिक वाहनांवर HSRP नंबर प्लेट बसवण्यात आलेली नाही, किंवा त्यासाठी कोणतीही नोंदणी झालेली नाही. या वाढत्या निष्काळजीपणामुळे अखेर परिवहन विभागाने थेट रस्त्यावर उतरून धडक कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. ज्या वाहनांवर अजूनही जुन्या किंवा अनधिकृत नंबर प्लेट्स आहेत, त्यांच्यावर आता कारवाईचा फास आवळला जाणार आहे.
एचएसआरपी नंबर प्लेटची अंमलबजावणी प्रभावीपणे करण्यासाठी परिवहन विभागाने विशेष पथके तयार केली आहेत. या पथकांकडून विविध ठिकाणी वाहनांची तपासणी केली जाणार आहे. विशेषतः एचएसआरपी नंबर प्लेट नसलेल्या वाहनांवर लक्ष ठेवले जाणार असल्याची माहिती आहे.
हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट ही अॅल्युमिनियमपासून तयार केलेली विशेष नंबर प्लेट आहे. ही प्लेट वाहनाच्या पुढील आणि मागील बाजूस बसवली जाते. HSRP च्या वरच्या डाव्या कोपऱ्यात निळ्या रंगाचा क्रोमियम आधारित अशोकचक्राचा होलोग्राम असतो. तसेच, प्लेटच्या डाव्या बाजूस लेझर-ब्रँडेड 10 अंकी कायमस्वरूपी ओळख क्रमांक दिलेला असतो. याशिवाय, वाहनाच्या नोंदणी क्रमांकातील अक्षरे आणि अंकांवर हॉट-स्टॅम्प फिल्म लावलेली असते. त्यासोबत निळ्या रंगात 'IND' असे लिहिलेले असते. विशेष म्हणजे, वाहनाची डिजिटल नोंदणी झाल्यानंतरच HSRP जारी केली जाते. त्यामुळे ही नंबर प्लेट विशिष्ट वाहनाशी जोडलेली असते आणि ती दुसऱ्या वाहनावर वापरता येत नाही.
हाय सिक्युरिटी नंबर प्लेटचा सर्वात मोठा फायदा म्हणजे वाहन चोरी आणि वाहनांचा गैरवापर यांसारख्या गुन्ह्यांना आळा घालण्यास मदत होणार आहे. HSRP प्रणालीमुळे वाहनाचा माग काढणे अधिक सोपे होऊ शकते. HSRP वर बारकोड आणि होलोग्राम असतो. तसेच, क्रोमियम प्लेटेड नंबर आणि एम्बॉस्ड अक्षरांमुळे रात्रीच्या वेळीही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून वाहनाचा नंबर सहज ओळखता येतो. याशिवाय, पोलिस आणि वाहतूक कर्मचाऱ्यांच्या मोबाइलमध्ये विशेष सॉफ्टवेअर उपलब्ध असू शकते. वाहन तपासणीदरम्यान HSRP नंबर प्लेटचा फोटो स्कॅन केल्यानंतर संबंधित वाहनाची नोंदणी आणि इतर आवश्यक माहिती सहज उपलब्ध होण्यास मदत होते. त्यामुळे HSRP नंबर प्लेटमुळे वाहनांची ओळख अधिक सुरक्षित होण्यासोबतच वाहन चोरी, बनावट नंबर प्लेटचा वापर आणि वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर कारवाई करणे अधिक सोपे होण्याची अपेक्षा आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.