पुण्यातील महिला पोलिसांचा समलिंगी विवाह रद्द, अचानक लागलेल्या ब्रेकमागील कारणांची चर्चा
पुणे : खरा पंचनामा
पिंपरी-चिंचवड पोलिस दलातील दोन महिला पोलिस कर्मचाऱ्यांच्य प्रस्तावित विवाहाला अखेर ब्रेक लागला आहे. येत्या ३० ऑगस्ट रोजी आळंदी येथे वैदिक पद्धतीने विवाह करण्याची तयारी दोघींनी केली होती.
विवाहासाठी दोघींनी पोलिस प्रशासनाकडे सुट्टीचा अर्जही सादर केला होता. मात्र आता हा विवाह रद्द झाल्याची माहिती समोर आली आहे. विवाह नेमका कोणत्या कारणामुळे रद्द झाला, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
पोलिस भरतीच्या काळात दोघींची ओळख झाली होती. पोलिस होण्याचे स्वप्न घेऊन पिंपरी-चिंचवडमध्ये दाखल झाल्यानंतर भरती प्रक्रियेतील सर्व टप्पे पूर्ण करुन दोघी पोलिस शिपाई म्हणून सेवेत रुजू झाल्या. प्रशिक्षणानंतर काही काळ दोघींची मुख्यालयात नियुक्ती होती. त्यानंतर शहरातील मध्यवर्ती भागातील एकाच पोलिस ठाण्यात त्यांची नियुक्ती झाली.
याच काळात दोघींमध्ये जवळीक निर्माण झाली आणि त्यांनी आयुष्यभर एकत्र राहण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली होती. त्यांच्या नात्याला एका महिला पोलिस कर्मचाऱ्याच्या कुटुंबीयांकडून विरोध असल्याचीही चर्चा होती. कुटुंबीयांनी याबाबत पोलिस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडेही धाव घेतल्याचे सांगितले जात होते.
दरम्यान, दोघींनी विवाहासाठी अधिकृतपणे सुट्टीचा अर्ज सादर केला होता. विशेष म्हणजे या अर्जासोबत लग्नपत्रिकाही जोडण्यात आली होती. त्यामुळे त्यांच्या प्रस्तावित विवाहाची पोलिस दलासह परिसरात मोठी चर्चा झाली होती.
आता अचानक हा विवाह रद्द झाल्याने विविध प्रश्न उपस्थित झाले आहेत. कुटुंबीयांचा विरोध, वैयक्तिक कारणे किंवा अन्य कोणते कारण यामागे आहे का, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती उपलब्ध झालेली नाही.
दरम्यान, या दोघींपैकी एका महिला पोलिस कर्मचाऱ्याकडून लिंगबदलाशी संबंधित वैद्यकीय उपचार सुरू असल्याची माहिती यापूर्वी समोर आली होती. या पार्श्वभूमीवरही त्यांच्या प्रस्तावित विवाहाबाबत चर्चा रंगली होती. मात्र विवाह रद्द होण्याचे कारण याच्याशी संबंधित आहे का, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
भारतामध्ये सज्ञान समलैंगिक व्यक्तींमधील परस्पर संमतीने असलेले संबंध गुन्हा मानले जात नाहीत. मात्र, समलैंगिक विवाहाला सध्या कायदेशीर विवाहाचा दर्जा मिळालेला नाही. त्यामुळे या प्रकरणाकडे पोलिस दलासह कायदेशीर आणि सामाजिक दृष्टिकोनातूनही पाहिले जात होते.
आता विवाहच रद्द झाल्याने त्यामागचे नेमके कारण काय, याची उत्सुकता निर्माण झाली आहे. पोलिस प्रशासन किंवा संबंधित महिला कर्मचाऱ्यांकडून अधिकृत भूमिका समोर आल्यानंतरच याबाबतचे चित्र स्पष्ट होणार आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.