Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

'पोलीस ठाणे पेटवून देईन" तरुणाचा पोलीस ठाण्यातच तुफान राडा ! महिला पोलिसांना दिली जीवे मारण्याची धमकी..

'पोलीस ठाणे पेटवून देईन" तरुणाचा पोलीस ठाण्यातच तुफान राडा ! 
महिला पोलिसांना दिली जीवे मारण्याची धमकी..

पुणे : खरा पंचनामा 

पुण्यातील सहकारनगर पोलीस ठाण्यात घडलेल्या धक्कादायक प्रकारामुळे शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. मित्राला सोडवण्यासाठी थेट पोलीस ठाण्यात घुसलेल्या एका तरुणाने पोलिसांना शिवीगाळ करत पोलीस ठाणे पेटवून देण्याची आणि महिला पोलिसांना जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना समोर आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धनकवडी परिसरात गेल्या वर्षी एका तरुणावर कोयत्याने प्राणघातक हल्ला झाल्याच्या प्रकरणातील एका आरोपीला चौकशीसाठी सहकारनगर पोलीस ठाण्यात आणण्यात आले होते. तपास पथक त्याची चौकशी करत असताना आरोपीचा मित्र विनायक दत्तात्रय भोंडवे (वय 24) पोलीस ठाण्यात आला.

पोलीस ठाण्यात प्रवेश करताच त्याने तपास पथकाच्या खोलीचे दार उघडण्याचा प्रयत्न केला आणि "माझ्या मित्राला तात्काळ सोडा, अन्यथा पोलीस ठाणे पेटवून देईन," अशी धमकी दिली. त्यानंतर त्याने पोलिसांना शिवीगाळ करत खोलीच्या दारावर लाथा मारल्या आणि पोलीस ठाण्यात तोडफोड करण्यास सुरुवात केली.

आरोपीने सर्व्हेलन्स रूममधील फायबरची खुर्ची तोडली. तसेच बालस्नेही कक्षासमोरील भिंतीजवळील फरशी उचकटून ती जमिनीवर आपटत नुकसान केले. यावेळी कर्तव्यावर असलेल्या महिला पोलीस कर्मचाऱ्यांनाही त्याने धमकावत "कोयत्याने वार करेन आणि गोळ्या घालीन," असे म्हणत जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे.

या प्रकारानंतर सहकारनगर पोलिसांनी तातडीने कारवाई करत विनायक भोंडवे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलीस नाईक मारुती उत्तमराव नलवाड यांनी याप्रकरणी फिर्याद दिली असून, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप खंडागळे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.