Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

सांगलीत परराज्यातील घरफोडी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाशएलसीबीकडून एकाला अटक, १.३६ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

सांगलीत परराज्यातील घरफोडी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश
एलसीबीकडून एकाला अटक, १.३६ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

पूजा फडके 
सांगली : खरा पंचनामा 

सांगली जिल्ह्यातील कडेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या घरफोडी प्रकरणाचा अवघ्या काही दिवसांत छडा लावण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला (LCB) यश आले आहे. या कारवाईत मध्यप्रदेशातील एका सराईत आरोपीला रंगेहाथ पकडण्यात आले असून त्याच्याकडून चोरीचे चांदीचे दागिने आणि दोन दुचाकी असा एकूण १,३६,१५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलीस अधीक्षक तुषार दोशी आणि अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांच्या सूचनेनुसार एलसीबीचे पथक परिसरातील गुन्ह्यांचा शोध घेत होते. या दरम्यान पथकाला खबऱ्याकडून खात्रीशीर माहिती मिळाली की, कडेगाव ते कडेपूर रस्त्यावरील राजवीर मंगल कार्यालयाजवळ चार संशयित इसम दोन दुचाकींवरून चोरीचे दागिने विकण्यासाठी येणार आहेत.

प्राप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी त्वरित घटनास्थळी सापळा रचला. संशयित इसम तेथे आले असता पोलिसांनी त्यांना घेरण्याचा प्रयत्न केला. मात्र, अंधाराचा फायदा घेऊन तिघे जण दुचाकी सोडून पळून जाण्यात यशस्वी ठरले, तर एकाला पोलिसांनी ताब्यात घेतले. गवली छत्तेसिंग आदिवासी (वय २२, रा. चौपडा, जि. पन्ना, मध्य प्रदेश) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

ताब्यात घेतलेल्या आरोपीची पंचांसमक्ष अंगझडती घेतली असता त्याच्याकडे चांदीचे ब्रेसलेट व करदोडा मिळून आला. पोलिसी खाक्या दाखवताच त्याने पसार झालेल्या आपल्या तीन साथीदारांसह – जबरास जगदीश पारधी, कुणाल कंजर आणि महाराजा सुरभ लेले (सर्व रा. मध्यप्रदेश) – सुमारे ७ ते ८ दिवसांपूर्वी तांदुळवाडी येथील कांताबाई चरकडे यांचे बंद घर फोडून सोने-चांदीचे दागिने चोरल्याची कबुली दिली.
या कारवाईत पोलिसांनी १६,१५० रुपये किमतीचे ७० ग्रॅम चांदीचे दागिने आणि १,२०,००० रुपये किमतीच्या दोन मोटार सायकली (ड्रीम युगा - MH-16-BK-4529 आणि एचएफ डिलक्स - MH-42-AC-1368) हस्तगत केल्या आहेत. 

एलसीबीचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत निशाणदार, पोलीस उप-निरीक्षक कुमार पाटील, संजय पाटील आणि त्यांच्या पथकाने ही मोहीम फत्ते केली असून पुढील तपास कडेगाव पोलीस करत आहेत.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.