मिरजेत एसटी बस वाहकावर कोयता हल्ला; धाडसी पोलीस अंमलदाराने जखमी अवस्थेतही गुन्हेगारांना ठोकल्या बेड्या
पूजा फडके
सांगली : खरा पंचनामा
मिरज शहरातील छत्रपती शिवाजी महाराज रोडवरील मार्केट यार्ड गेटसमोर एसटी बसवर कोयत्याने हल्ला करून चालक आणि वाहकाला जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना पोलिसांनी अत्यंत धाडसाने रंगेहाथ ताब्यात घेतले. २५ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री ९:०० वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या भीषण कारवाईदरम्यान झालेल्या झटापटीत महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल कोंडीबा सरगर गंभीर जखमी झाले. स्वतःच्या जिवाची पर्वा न करता दोन्ही आरोपींना अटक करून वाहक व चालकाचे प्राण वाचवल्याबद्दल पोलीस प्रशासनासह सर्वस्तरातून कॉन्स्टेबल सरगर यांच्या समयसूचकतेचे आणि धैर्याचे कौतुक होत आहे.
त्या रात्री महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याचे बीट मार्शल पोलीस कॉन्स्टेबल कोंडीबा सरगर आणि धनंजय घुबडे हे परिसरात गस्त घालत असताना दोन तरुण हातात धारदार कोयता घेऊन एका एसटी बसला अडवून काचा फोडत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. पोलीस रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार अब्दुलरेहमान अख्तर पटेल व त्याचा साथीदार सैफूल्ला अख्तर पटेल (दोघे रा. उस्मानिया मोहल्ला, भारतनगर, मिरज) यांनी एसटी बस रोखून कंडक्टर महादेव बाबासाहेब शिंदे यांच्यावर कोयत्याने वार करून त्यांना जखमी केले होते, तर ड्रायव्हर परमेश्वर सुखदेव लामकानी यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण सुरू केली होती.
घटनास्थळाचे गांभीर्य ओळखून कॉन्स्टेबल कोंडीबा सरगर आणि धनंजय घुबडे यांनी तत्काळ आरोपींच्या दिशेने धाव घेतली. आरोपींकडे धारदार शस्त्रे असल्याचे माहिती असूनही त्यांनी जीवाची पर्वा न करता आरोपींना पकडण्याचा प्रयत्न केला. या झटापटीत आरोपीने कॉन्स्टेबल सरगर यांच्या पोटात धारदार कोयत्याने वार करून त्यांना गंभीर जखमी केले. मात्र, गंभीर दुखापत झाली असतानाही, डगमगून न जाता कॉन्स्टेबल सरगर यांनी अत्यंत धैर्याने दोन्ही शस्त्रास्त्रधारी गुन्हेगारांना जागीच पकडून ठेवून चालक-वाहकाची सुटका केली.
या प्रकरणी सांगलीचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अजय कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे नोंदवून दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. पहिला गुन्हा एसटी चालक परमेश्वर लामकानी यांच्या फिर्यादीवरून (गु.र.नं. २७७/२०२६) भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांन्वये, तर दुसरा गुन्हा पोलीस अंमलदार धनंजय घुबडे यांच्या फिर्यादीवरून (गु.र.नं. २७८/२०२६) दाखल करण्यात आला आहे.
पोलीस कॉन्स्टेबल कोंडीबा सरगर यांच्या या उल्लेखनीय कर्तव्यदक्षतेबद्दल सांगली जिल्हा पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांचे विशेष कौतुक केले असून, एसटी महामंडळाच्या मिरज आगारातर्फे त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विश्वजीत गाडवे व बसवराज हर्डीकर करत आहेत.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.