वाढीव घरपट्टीविरोधातील सांगली बंदला सांगली जिल्हा शिक्षण संस्था संघाचा जाहीर पाठिंबा
सांगली : खरा पंचनामा
सांगली, मिरज व कुपवाड महानगरपालिकेने केलेल्या अवास्तव व अन्यायकारक घरपट्टी वाढीच्या निषेधार्थ वाढीव घरपट्टी आंदोलन कृती समितीने दि. ४ ऑगस्ट २०२६ रोजी पुकारलेल्या सांगली बंद आंदोलनास सांगली जिल्हा शिक्षण संस्था संघाने जाहीर व संपूर्ण पाठिंबा दर्शविला आहे.
यासंदर्भात संघाचे अध्यक्ष रावसाहेब पाटील व सेक्रेटरी विनोद पाटोळे यांनी वाढीव घरपट्टी आंदोलन कृती समितीचे अध्यक्ष यांच्याकडे निवेदन सादर केले.
निवेदनात म्हटले आहे की, शिक्षण संस्था या नफा कमाविणाऱ्या व्यापारी संस्था नसून समाजहितासाठी कार्य करणाऱ्या धर्मादाय संस्था आहेत. त्यामुळे त्यांच्यावर व्यापारी संस्थांप्रमाणे घरपट्टी लादणे अथवा त्यामध्ये अवास्तव वाढ करणे योग्य नाही. घरपट्टीतील वाढीमुळे शिक्षण संस्थांच्या आर्थिक नियोजनावर मोठा परिणाम होत असून त्याचा अप्रत्यक्ष फटका विद्यार्थी व पालकांनाही बसू शकतो.
शिक्षण संस्थांचे धर्मादाय स्वरूप लक्षात घेऊन त्यांना घरपट्टीमधून संपूर्ण माफी द्यावी तसेच महानगरपालिकेने वाढीव घरपट्टीचा निर्णय तात्काळ मागे घ्यावा, अशी मागणीही निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
वाढीव घरपट्टीविरोधातील लढा हा सर्वसामान्य नागरिक, व्यापारी, उद्योग आणि शिक्षण क्षेत्राच्या हिताचा असल्याने या आंदोलनास सांगली जिल्हा शिक्षण संस्था संघाचा पूर्ण पाठिंबा असल्याचे अध्यक्ष रावसाहेब पाटील यांनी स्पष्ट केले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.