मेडिकल बिल कमी होणार !
बीपी, शुगर, डिप्रेशन, हार्ट अटॅकच्या गोळ्या झाल्या स्वस्त; सरकारने 23 औषधांचे दर केले फिक्स
नवी दिल्ली : खरा पंचनामा
तुमच्या घरात हृदयविकाराचा रुग्ण असेल, कोणाला मधुमेह असेल किंवा उच्च रक्तदाब (बीपी), नैराश्य (डिप्रेशन) अथवा चिंतेच्या (Anxiety) आजारावर उपचार सुरू असतील तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे.
केंद्र सरकारच्या राष्ट्रीय औषध किंमत निर्धारण प्राधिकरणाने रुग्णांना मोठा दिलासा देत 23 नवीन औषधांच्या कमाल किरकोळ किमती निश्चित केल्या आहेत.
या निर्णयानंतर कोणतेही मेडिकल स्टोअर किंवा औषध उत्पादक कंपनी या औषधांची विक्री निश्चित केलेल्या किमतीपेक्षा जास्त दराने करू शकणार नाही.
हा नवीन आदेश औषध किंमत नियंत्रण आदेश, 2013 (DPCO-2013) अंतर्गत अधिकृत अधिसूचना जारी करून लागू करण्यात आला आहे. NPPA ने स्पष्ट केले आहे की, जाहीर करण्यात आलेल्या किंमती जीएसटी (GST) वगळून आहेत. त्यामुळे ग्राहक औषध खरेदी करताना निश्चित किमतीवर नियमानुसार जीएसटी स्वतंत्रपणे भरावा लागेल.
NPPA ने सर्व औषध उत्पादक कंपन्यांना स्पष्ट निर्देश दिले आहेत की, या 23 औषधांची विक्री निश्चित कमाल किरकोळ किमतीपेक्षा जास्त दराने करता येणार नाही. याशिवाय पुढील 12 महिन्यांच्या आत जर एखाद्या कंपनीने याच प्रकारातील नवीन औषध बाजारात आणले तर त्या औषधाची किंमतही याच निश्चित दरमर्यादेत ठेवावी लागेल.
औषध बाजारात आणल्यानंतर एका महिन्याच्या आत संबंधित कंपनीने आवश्यक कागदपत्रे NPPA च्या पोर्टलवर सादर करणे बंधनकारक असेल. तसेच सर्व उत्पादक कंपन्यांनी नवीन किंमत यादी प्रसिद्ध करून ती NPPA आणि संबंधित राज्यांच्या औषध नियंत्रकांकडे जमा करणे आवश्यक आहे.
जर कोणत्याही कंपनीने या आदेशाचे उल्लंघन केले किंवा ग्राहकांकडून जास्त पैसे वसूल केले तर तिच्यावर DPCO-2013 आणि आवश्यक वस्तू अधिनियम, 1955 अंतर्गत कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल. तसेच जादा आकारलेली रक्कम व्याजासह परत जमा करावी लागेल.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.