२.९५ लाखांच्या सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह अट्टल घरफोड्या पवन पवार गजाआड
सांगली पोलिसांची धडाकेबाज कामगिरी!
पूजा फडके
सांगली : खरा पंचनामा
सांगली शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने धडाकेबाज कारवाई करत घरफोडी आणि चोरी करणाऱ्या एका अट्टल आरोपीला रंगेहात पकडून बेड्या ठोकल्या आहेत. पवन प्रकाश पवार (वय ३१, रा. भारत चौक, खणभाग, सांगली) असे अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपीचे नाव असून त्याच्याकडून सुमारे २ लाख ९५ हजार रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. या कारवाईमुळे सांगली शहरातील घरफोडीचे एकूण ४ गंभीर गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले आहे.
पोलीस अधीक्षक तुषार दोषी, अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अजय कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अरुण सुगांवकर यांनी शहरातील घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी विशेष पथक तयार केले होते. २९ ऑगस्ट २०२६ रोजी पोलीस अंमलदार संदीप पाटील आणि सचिन तिवडे यांना गोपनीय बातमीदाराकडून बातमी मिळाली की, संशयित पवन पवार हा चोरीचे दागिने विक्री करण्यासाठी सांगलीतील स्टेशन चौक परिसरात येणार आहे. मिळालेल्या बातमीच्या आधारे पोलिसांनी स्टेशन चौक येथे तात्काळ सापळा रचून पवार याला ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्या आरोपीची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे सोन्या-चांदीचे दागिने मिळून आले.
पोलिसांनी त्याला विश्वासात घेऊन कडक चौकशी केली असता, त्याने आकाशवाणी केंद्राच्या पाठीमागील बंद घराचे कुलूप तोडून तसेच हरीपूर रोड, काळीवाट साई मंदिर परिसरातील घरातून हे दागिने चोरल्याची कबुली दिली. आरोपीकडून २९ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आणि ३३९ ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने असा एकूण २,९५,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या यशस्वी कामगिरीत पोलीस उपनिरीक्षक संतोष यादव यांच्यासह संदीप पाटील, सचिन तिवडे, विनायक शिंदे, सतीश लिंबळे, गौतम कांबळे, संतोष गळवे, शंकर रणधीर, गणेश कांबळे, गणेश कोळेकर, अभिषेक वाडकर, दिग्विजय साळुंखे यांनी सहभाग घेतला.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.