सांगलीतील कृष्णा घाट खून प्रकरणातील 'आर. के. गँग'वर मोक्का
टोळीप्रमुख राकेश कांबळेसह ८ जणांवर कडक कारवाई
पूजा फडके
सांगली : खरा पंचनामा
सांगली शहरातील कृष्णा घाटावर झालेल्या खुनाच्या गुन्ह्यातील कुख्यात 'आर. के. गँग' टोळीतील टोळीप्रमुखासह दोन बालकांवर आणि इतर सदस्यांवर 'महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम' (मोक्का) अंतर्गत कारवाईस मंजुरी देण्यात आली आहे. कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक रंजन कुमार शर्मा यांनी सांगली जिल्ह्यातील वाढत्या संघटित गुन्हेगारीचा बीमोड करण्यासाठी या प्रस्तावाला तात्काळ मंजुरी दिली आहे.
या प्रकरणात न्यू टिंबर एरिया येथील रहिवासी असलेला टोळीप्रमुख राकेश शामराव कांबळे (वय ३१) याच्यासह लखन पंडित इसरडे (वय ३५), कृष्णा ऊर्फ मुडक्या कुटनाप्पा कांबळे (वय २५), करण किशोर शिंदे (वय २७), महेश विजय नाटेकर (वय १९), सुनील ऊर्फ मुक्या निलाप्पा खडते (वय ३८) आणि दोन विधिसंघर्षग्रस्त बालकांचा समावेश आहे. या टोळीचे सदस्य स्वतःच्या उपजीविकेसाठी कोणताही कायदेशीर धंदा न करता सांगली शहर आणि विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हेगारी कारवाया करत होते.
सदर टोळीने सन २०१६ पासून परिसरात स्वतःचे वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी आणि आर्थिक फायद्यासाठी बेकायदेशीर जमाव जमवून खून करणे, खुनाचा प्रयत्न करणे, घातक हत्यारांनी जबरी चोरी करणे, बेकायदेशीर दारू व शस्त्रे बाळगून नागरिकांमध्ये भीती निर्माण करणे यांसारखे अनेक गंभीर गुन्हे केले आहेत.
सांगली शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरुण सुगांवकर यांनी सहाय्यक संचालक सरकारी अभियोक्ता ॲड. उज्ज्वला थोरात यांच्या अभिप्रायानंतर मोक्का कायद्याचा प्रस्ताव पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्यामार्फत विशेष पोलीस महानिरीक्षकांकडे पाठवला होता.
या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर गुन्ह्याचा पुढील तपास ईश्वरपूर उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी अरुण पाटील यांच्याकडे वर्ग करण्यात आला आहे. ही कारवाई वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा व सांगली शहर पोलीस ठाण्याच्या पथकाने संयुक्तपणे पार पाडली आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.