जरांगेंचा अल्टिमेटम आज संपणार. अंतरवलीत घडामोडींना वेग; आता थेट...
जालना : खरा पंचनामा
मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला दिलेला अल्टिमेटम आज संपणार आहे. अर्धा दिवस उलटला तरी सरकारकडून कोणीही मनोज जरांगे यांच्याशी चर्चा करायला आलेलं नाहीये. त्यामुळे आता जालन्याच्या अंतरवली सराटीत हालचाली वाढल्या आहेत.जरांगे उद्यापासून निर्णायक आंदोलन करणार आहेत. राज्यातील सर्व मराठ्यांना त्यांनी अंतरवलीत येण्याची हाक दिली आहे. त्या पार्श्वभूमीवर अंतरवलीत बैठका सुरू आहेत. आंदोलनाची रणनीती ठरवली जात आहे.
मनोज जरांगे पाटील उद्यापासून अंतरवाली सराटीमध्ये शेवटचं निर्णायक आंदोलन सुरू करणार आहेत. या सगळ्या संदर्भात आज दिवसभरात काय काय घडामोडी घडतात हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे. सरकारच्या शिष्टमंडळाने जरांगे यांना उपोषण न करण्याची विनंती केली होती. मात्र 58 लाख नोंदींचे कुणबी प्रमाणपत्र यासह इतर प्रमुख मागण्यांसाठी जरांगे उद्याच्या निर्णायक आंदोलनावर ठाम आहेत. सरकारचं शिष्टमंडळ भेटीसाठी आल्यानंतर जरांगे पाटलांनी त्यांच्यासमोर या मागण्या ठेवल्या होत्या. त्या अनुषंगाने आज सरकारकडून मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत काही संपर्क होतो का? याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.
मनोज जरांगे पाटील अंतरवलीतच आहेत. कार्यकर्ते आणि समाजातील प्रतिष्ठीत व्यक्तिंशी चर्चा करत आहेत. त्यांना आपली भूमिका समजावून सांगत आहेत. तसेच आंदोलनाच्या तयारीचा आढावाही घेत असल्याचं सूत्रांनी सांगितलं. दरम्यान, जरांगे यांनी आज परत एकदा आपली भूमिका स्पष्ट करत उद्या आंदोलन होणार असल्याचं संकेतही दिले आहेत.
संध्याकाळपर्यंत काही होतंय का ते मी पाहणार आहे. ज्यांना यायचं ते चर्चा करायला येतील. मी संकटावर मात करण्यासाठी पक्का आहे. मी एकही मागणी मागे ठेवणार नाही, असं जरांगे म्हणाले.
समाजाने घरात बसू नये. ज्यांनी कुणबी प्रमाणपत्रासाठी अर्ज दिले आहेत. त्यांनी अंतरवलीत येऊन परत अर्ज द्यावे. समाजाने मरगळ झटकून टाकावी. एकत्र यावे. ज्यांची नोंद सापडली. पण प्रमाणपत्र दिले नाही अशा लोकांनी देखील अर्ज द्यावेत. मराठ्यांनी नोंद घेऊन घरी झोपू नये, अंतरवालीत यावे, असं आवाहन करतानाच मराठ्यांचे वाटोळे करू नका. मराठे तुम्हाला थोबाडून काढतील, असा इशाराच त्यांनी राज्यकर्त्यांना दिला आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.