Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

शरद पवारांच्या राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली? रोहित पवारांची कोअर कमिटीच्या बैठकीला दांडी; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

शरद पवारांच्या राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली? 
रोहित पवारांची कोअर कमिटीच्या बैठकीला दांडी; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

मुंबई : खरा पंचनामा 

गेल्या काही दिवसांपासून राज्यभर दौरे, आंदोलने आणि विविध राजकीय कार्यक्रमांमध्ये सक्रिय सहभाग नोंदवणारे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आमदार रोहित पवार सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत. अलीकडच्या काळात काँग्रेसशी वाढलेली राजाच्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय आहे. आज शनिवार मुंबईत झालेल्या पक्षाच्या कोअर कमिटीच्या बैठकीला आमदार रोहित पवारांनी दांडी मारल्यान राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

देशाच्या राजकारणातील ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील पक्षाच्या महत्त्वाच्या बैठकीला रोहित पवार अनुपस्थित राहिल्याने त्यांच्या गैरहजेरीमागचं नेमकं कारण काय, याबाबत राजकीय वर्तुळात तर्कवितर्क सुरू झाले आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आपल्या अनुपस्थितीची माहिती प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांना दिल्याचे सांगितले जात आहे.

मुंबईत झालेल्या या बैठकीला जितेंद्र आव्हाड, हर्षवर्धन पाटील, प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, माजी आमदार अशोक पवार, राजेंद्र शिंगणे, अनिल देशमुख आणि खासदार निलेश लंके यांच्यासह पक्षाचे प्रमुख नेते उपस्थित होते. स्वतः शरद पवारही बैठकीला उपस्थित होते. दहा दिवसांपूर्वी राज्यातील सर्व जिल्हाध्यक्षांसोबत झालेल्या बैठकीत मांडण्यात आलेल्या विविध मुद्द्यांवर या कोअर कमिटीच्या बैठकीत चर्चा करण्यात आल्याची माहिती आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या संभाव्य विलिनीकरणाबाबत चर्चा सुरूच आहे. रोहित पवार हे भाजपसोबत हातमिळवणी करून NDA मध्ये सहभागी होण्याच्या भूमिकेला विरोध करत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे पक्षाच्या भविष्यातील राजकीय भूमिकेबाबत त्यांच्या मताला विशेष महत्त्व आहे. यासोबतच बैठकीत नाशिकच्या कुंभमेळ्याच्या नावाखाली समोर आलेल्या बोगस भरती रॅकेट, शासकीय भरती प्रक्रियेतील पेपरफुटी आणि इतर गैरव्यवहार या मुद्यांवर चर्चा झाल्याचे समजते.

अशातच कोअर कमिटीच्या बैठकीतील त्यांची अनुपस्थिती आणि अलीकडच्या काळातील त्यांच्या राजकीय हालचाली यामुळे रोहित पवार भविष्यात काही वेगळा राजकीय निर्णय घेणार का, याबाबत चर्चांना सुरुवात झाली आहे. मात्र, याबाबत रोहित पवार किंवा त्यांच्या पक्षाकडून अधिकृतपणे कोणतीही भूमिका स्पष्ट करण्यात आलेली नाही. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या या केवळ राजकीय चर्चा आहेत की त्यामागे काही मोठी राजकीय घडामोड दडलेली आहे, हे आगामी काळात स्पष्ट होणार आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.