Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

सुखबीर सिंग यांच्या प्राणांचं रक्षण, बादल कुटुंब धाडसी पोलीस अधिकारी संतोष केंद्रेच्या पाया पडले, रोख बक्षीसही जाहीर

सुखबीर सिंग यांच्या प्राणांचं रक्षण, बादल कुटुंब धाडसी पोलीस अधिकारी संतोष केंद्रेच्या पाया पडले, रोख बक्षीसही जाहीर

नांदेड : खरा पंचनामा 

पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीरसिंग बादल गुरुवारी झालेल्या कृपाण हल्ल्यात जखमी झाले. त्यांच्या उजव्या हाताला जखम झाली असून प्रकृती स्थिर आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

या प्रकरणात हल्लेखोर जसपालसिंग याला अटक करण्यात आली आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे बादल यांच्यासोबत असलेल्या 'एसपीयू'चे निरीक्षक संतोष केंद्रे यांनी चपळाईने हल्लेखोराला रोखले. हल्ल्यात रक्तबंबाळ झालेल्या केंद्रे यांची बादल कुटुंबीयांनी विचारपूस करत चरणस्पर्श केले. तसेच त्यांना पाच लाख रुपयांचे बक्षीसही जाहीर केले.

सुखबीरसिंग बादल यांच्यासोबत त्यांच्या पत्नी खासदार हरसिमरतकौर बादल व त्यांच्या परिवारातील दोन सदस्य नांदेडमध्ये आले आहेत. येथील मुख्य गुरुद्वारात बादल परिवारातर्फे अखंड पाठ ठेवण्यात आला असून, त्याची सुरुवात बुधवारी सायंकाळनंतर झाली, तर शनिवारी या पाठाची समाप्ती होणार आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सुखबीरसिंग बादल हे बुधवारी सायंकाळी गुरुद्वारा दर्शनासाठी नांदेडमध्ये दाखल झाले होते. त्यांच्या संरक्षणासाठी मोठा बंदोबस्त होता. गुरुवारी बादल दर्शनासाठी नांदेडपासून जवळच असलेल्या ऐतिहासिक माता साहिब गुरुद्वारा येथे गेले होते. दुपारी पावणेदोनच्या सुमारास सहपरिवार दर्शन घेऊन बाहेर येत असतानाच निहंगांची वस्त्रे परिधान केलेल्या हल्लेखोराने त्यांच्यावर कृपाणाने (छोटी तलवार) वार केला. बादल यांच्यावर गेल्या काही काळात झालेला हा दुसरा हल्ला आहे. चार डिसेंबर २०२४ रोजी त्यांच्यावर सुवर्णमंदिराच्या प्रवेशद्वाराशी गोळीबार झाला होता.

महाराष्ट्र पोलिसांच्या 'स्पेशल प्रोटेक्शन युनिट'चे (एसपीयू) निरीक्षक संतोष केंद्रे यांनी जेव्हा हल्लेखोराला हातात 'कृपाण' घेऊन पुढे येताना पाहिले, तेव्हा स्वतःच्या जीवाची पर्वा न करता त्यांनी त्वरित त्या धोक्याचा सामना करण्यासाठी पुढाकार घेतला. निरीक्षक केंद्रे यांनी सुखबीर बादल आणि हल्लेखोर यांच्यामध्ये स्वतःला उभे करून एक मानवी ढाल तयार केली. हल्लेखोराला नियंत्रणात आणण्याच्या आणि सुखबीर बादल यांची सुरक्षा निश्चित करण्याच्या प्रयत्नात केंद्रेच्याही हाताला दुखापत झाली. दुखापत होऊन, रक्तस्त्राव होत असतानाही निरीक्षक केंद्रे मागे हटले नाहीत. उलट त्यांनी अत्यंत धैर्याने परिस्थिती हाताळली आणि सुखबीर सिंग बादल यांना पूर्णपणे सुरक्षित ठेवले.

हल्ल्यात जखमी झालेले निरीक्षक संतोष केंद्रे यांना उपचारांसाठी रुग्णालयात नेण्यात आले, त्यावेळी एक अत्यंत हृदयस्पर्शी दृश्य पाहायला मिळाले. निरीक्षक संतोष केंद्रे यांची कर्तव्यनिष्ठा आणि शौर्य पाहून प्रभावित झालेल्या 'बादल' कुटुंबातील सदस्यांनी रुग्णालयात जाऊन त्यांची भेट घेतली. कृतज्ञतेच्या भावनेने भारावून जाऊन त्या कुटुंबीयांनी निरीक्षक संतोष केंद्रे यांचे चरणस्पर्श केले आणि त्यांचे आभार मानले. सुखबीरसिंग बादल यांच्या पत्नी हरसीमरत कौर यांनी केंदेंना पाच लाख रुपयांची रोख रक्कमही देऊ केली, अशी माहिती मिळते. नांदेडमधील त्या घटनेनंतर निरीक्षक संतोष केंद्रे यांच्या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.