मुंबई-गोवा महामार्ग का रखडला? राज ठाकरेंनी सांगितली ही दोन कारणे
माणगाव : खरा पंचनामा
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज (9 ऑगस्ट) सकाळी मुंबई गोवा महामार्गाची पाहणी केली. माणगावला महामार्गाचे काम पाहिल्यानंतर त्यांनी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले. 15 वर्षांपासून ऐकतोय मुंबई-गोवा महामार्ग होणार आहे.
हा महामार्ग कधी पूर्ण होणार, कोकणवासीयांचे हाल कधी संपणार, असा सवाल त्यांनी केला. त्याचवेळी राजकीय हस्तक्षेप आणि टक्केवारीमुळे मुंबई-गोवा महामार्ग रखडल्याचा घणाघाती आरोप त्यांनी केला. स्थानिक नेते आणि राजकीय हस्तक्षेपामुळे मुंबई-गोवा महामार्गाचे काम 15 वर्षांनंतरही पूर्ण न झाल्याबद्दल राज ठाकरे यांनी नाराजी आणि संताप व्यक्त केला. त्याचवेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी कंत्राटदार का पळून गेले, हे सांगावे असे आवाहनही केले. या दौऱ्यात राज ठाकरे यांनी कंत्राटदार तसेच सरकारी अधिकाऱ्यांशीही चर्चा केली.
राज ठाकरे मनसे शाखांचे उद्घाटन आणि मुंबई गोवा महामार्गाची पाहणी करण्यासाठी आले होते. यावेळी त्यांनी रखडलेल्या महामार्गावरून सरकारला लक्ष्य केलेच शिवाय तिसऱ्या मुंबईवरूनही सरकारवर टिकेचा बाण सोडले. तिसरी मुंबई कुणासाठी बनवली जात आहे? असा सवाल त्यांनी केला. सरकार स्थानिकांशी चर्चा करतंय का? बाहेरचे लोक आणायचे आणि त्यांना पोसायचे, हेच सुरू आहे. त्यांच्यासाठी तिसरी मुंबई बनवली जात आहे. यावेळी तिसऱ्या मुंबईत काय काय येणार, याची राज ठाकरे यांनी यादी वाचली आणि हे पेण, पनवेल, उरणमधील लोकांना-युवकांना माहीत आहे का, इथं कोणता विकास होतोय, याची स्थानिकांना कल्पना आहे का, असे सवाल त्यांनी केले. यावरून जमिनी विकणे एवढाच धंदा महाराष्ट्रात सुरू आहे, असा गंभीर आरोप त्यांनी केला.
मुंबई-गोवा महामार्गाच्या निमित्ताने एकदा नितीन गडकरी यांना विचारले होते. तेव्हा कंत्राटदार कंटाळून जातात, असे उत्तर गडकरी यांनी दिल्याचे राज ठाकरे यांनी सांगितले. यावरून राज ठाकरे यांनी गडकरींनाही सवाल केला आहे. मुंबई-गोवा महामार्गाचे काम करणारे कंत्राटदार का कंटाळून गेले, याचे उत्तर तुम्हीच द्यावे, असे सुनावले आहे. या महामार्गावरून सर्व लोकप्रतिनिधी एकत्र असते तर कधीच महामार्ग झाला असता, असा टोलाही त्यांनी लगावला.
प्रकल्पांसाठी शेतकऱ्यांच्या जमिनी जात आहेत. जमीन विकली की विषय संपला. कोणता प्रकल्प होणार, याची आपल्याकडच्या लोकांना माहिती नसते. त्यामुळे तो तयारी कशी करणार? म्हणूनच आजची कोकणाची परिस्थिती पाहिली तर विकास नको, अशी म्हणण्याची वेळ आली आहे, असे राज ठाकरेंनी सुनावले. स्थानिकांच्या जमिनी घेऊन त्यांना उद्ध्वस्त करण्याचे काम सुरू आहे. इथली जमीन, इथली वीज, इथल्या सुविधा आणि पोसले जाणार बाहेरचे ! महाराष्ट्रातल्या मुलांसाठी प्रगती होणार नसेल तर काय उपयोग? स्थानिकांना हे कळले पाहिजे. आपली जमीन जाते आणि जमीन केली की सर्व संपले. जे पुण्यातील मगरपट्टा भागातील शेतकऱ्यांनी शक्य केले ते इतर शेतकऱ्यांना शक्य का होत नाही? त्या शेतकऱ्यांनी एकी केली आणि प्रकल्पात भागीदार बनले, याकडे राज ठाकरेंनी लक्ष वेधले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.