आमदार सत्यजित तांबे पोलिसांच्या ताब्यात, गिरीश महाजनांच्या फोननंतरही आंदोलक आक्रमक
सिन्नर : खरा पंचनामा
नाशिक-पुणे सेमी हायस्पीड रेल्वे मार्ग पूर्वीच्याच मूळ अलाईन्मेंटनुसार सरळ मार्गे नेण्याच्या मागणीसाठी आज. रविवारी (दि. ९) क्रांती दिनाच्या पार्श्वभूमीवर जनक्षोभ उसळला. नाशिक पुणे रेल्वे ही नाशिक- संगमनेर- पुणे मार्गेच व्हावी यासाठी सिन्नर येथील समृद्धी महामार्ग परिसरात आमदार सत्यजित तांबे यांच्या नेतृत्वात आंदोलकांनी चक्का जाम केला. एकाचवेळी हजारो आंदोलक रस्त्यावर उतरले होते. यावेळी पोलिसांनी आमदार सत्यजित तांबे यांच्यासह काही आंदोलकांना ताब्यात घेतलं. पोलिस आणि आंदोलनकांमध्ये यावेळी झटापट झाली. आंदोलकांनी पोलिसांची गाडी अडवण्याचा प्रयत्न केला. तांबे यांना पोलिस सिन्नर पोलिस स्टेशनच्या दिशेने घेऊन गेले आहेत.
या रेल्वे प्रकल्पाचा मूळ मार्गात बदल केल्याने या निर्णयाच्या विरोधात सिन्नर, संगमनेर, अकोले, नाशिकमधील नागरिकांनी रस्त्यावर उतरून चक्काजाम आंदोलन केलं. या आंदोलनात माजी मंत्री बाळासाहेब थोरात, खासदार राजाभाऊ वाजे आणि आमदार सत्यजित तांबे सहभागी झाले होते. संगमनेर येथेही आंदोलन सुरू आहे.
पोलिसांनी आंदोलकांना समृद्धी मार्गावर जाण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला. दरम्यान पोलिसांनी सत्यजित तांबे यांच्यासह काही आंदोलकांना ताब्यात घेतले. त्यामुळे परिस्थिती आणखीनच चिघळली. आक्रमक आंदोलकांनी पोलिसांची गाडी अडवण्याचा प्रयत्न केला.
खोडद येथील खगोलशास्त्रीय दुर्बिणीचे कारण देत केंद्र सरकारने मूळ मार्ग रद्द करून 'नाशिक-शिर्डी-अहिल्यानगर-पुणे' असा वळणदार पर्याय समोर आणल्याने नागरिक आक्रमक झाले आहेत. आमदार सत्यजित तांबे यांनी शासनस्तरावर बैठका घेऊनही तोडगा न निघाल्याने आज क्रांतीदिनाचे औचित्य साधत हे आंदोलन पुकारलं होतं. नाशिक-पुणे सेमी हायस्पीड रेल्वे मार्ग पूर्वीच्याच मूळ आरेखानुसार करण्याची मागणी करण्यात आली आहे.
नाशिकच्या सिन्नरमध्ये आणि अहिल्यानगरमध्ये सकाळी 9 वाजल्यापासून आंदोलनाला सुरुवात झाली. नाशिक-पुणे रेल्वेसाठी सिन्नर-संगमनेर चाकणमध्ये एकाचवेळी आंदोलन करण्यात आलं. या चक्काजाम आंदोलनामुळे नाशिक-पुणे महामार्गावर वाहतूक ठप्प झाली. एकाचवेळी हजारो आंदोलक रस्त्यावर उतरले. या आंदोलनाच्या पार्श्वभुमीवर मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
आंदोलनादरम्यान मंत्री गिरीश महाजन यांनी आमदार सत्यजित तांबे यांना फोन केला. दोघांमध्ये चर्चा झाली. त्यावर ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या तज्ज्ञ समितीला कोणत्याही परिस्थितीत मुदतवाढ न देता 60 दिवसांत अंतिम अहवाल आला पाहिजे. समितीने फक्त तांत्रिक मुद्दे न तपासता, फक्त नफा तोट्याचे गणित न मांडता जनभावनेचा विचार केला पाहिजे. समितीने तालुक्या-तालुक्यात आणि गावागावात येऊन, जनसुनवाई / ग्रामसभा घेऊन जनभावना समजून घेतली पाहिजे. या तीन मागण्या तांबे यांनी पुढे केल्या.
याविषयावर लवकरच समिती गठीत करण्याचे आश्वासन सरकारच्या वतीने देण्यात आले. मंत्री महाजन यांनी समितीशी चर्चा करणार असल्याचे तसेच मुख्यमंत्र्यांच्या कानावर हा विषय घातल्याचे सांगितले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याला रात्री फोन केला होता. त्यांच्याशी सविस्तर चर्चा झाली. जनसुनावणी होईल आणि अहवाल 60 दिवसात येईल असे लेखी आश्वासन देण्याची मागणी तांबे यांनी महाजन यांच्याकडे केली. त्यावर महाजन यांनी लेखी आश्वासन देण्याचे फोनवरून जाहीर केले. मात्र, त्यानंतरही पोलिसांनी तांबे यांना ताब्यात घेतल्याने आंदोलक आणखी आक्रमक झाले.
रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी नाशिक पुणे रेल्वे मार्ग रद्द करण्याची घोषणा केली होती. त्याला स्थानिक नागरिकांनी तीव्र विरोध केला. आमदार सत्यजित तांबे यांच्या पाठपुराव्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत तज्ञांची समिती घोषित केली आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारवर दबाव निर्माण करण्यासाठी आजचा रास्ता रोको करण्यात आला. "जब तक रेल दौडेगी नहीं, तब तक लडाई रुकेगी नहीं!" हा आमचा सरकारला स्पष्ट इशारा असल्याचं तांबे यांनी म्हटलं आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.