Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

नाशिक कुंभमेळ्याच्या बनावट वर्क ऑर्डर; जामनेरमधून आणखी चार अटक

नाशिक कुंभमेळ्याच्या बनावट वर्क ऑर्डर; जामनेरमधून आणखी चार अटक 

नाशिक : खरा पंचनामा 

आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर करण्यात येणाऱ्या कामांचे बनावट कागदपत्रे व बनावट कार्यारंभ आदेश (वर्क ऑर्डर) तयार करून तीन कोटी पाच लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याच्या प्रकरणात नाशिक पोलिसांकडून अटकसत्र सुरू आहे.

या प्रकरणी जळगाव जिल्ह्यातील जामनेर येथून आणखी चार जणांना अटक करण्यात आली. या प्रकरणात अटक झालेल्यांची संख्या आता सहावर पोहोचली आहे.

नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे २०२७ मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी राज्य सरकारकडून ३५ ते ४० हजार कोटी रुपयांची कामे करण्यात येत आहेत. कुंभमेळ्याची कामे मिळवून देण्याच्या नावाखाली बनावट कार्यारंभ आदेश तयार करून मोठी आर्थिक फसवणूक करणारी साखळी उघड झाली. कुठलीही निविदा नसताना संशयितांनी ५९१ कोटी रुपयांच्या कामांचे बनावट कार्यारंभ आदेश देत तक्रारदाराची तीन कोटी पाच लाख रुपयांची फसवणूक केली. या प्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात तीन गुन्हे दाखल आहेत.

नाशिक पोलिसांनी जळगाव जिल्ह्यातील जामनेर येथून तनय महाजन (३२) आणि नरेंद्र महाजन (५१) यांना अटक केली होती. त्यानंतर शोएब अहमद अब्दुल सत्तार शेख (३६, रा. गणेशवाडी रोड, मदनीनगर, जामनेर), अब्दुल रईस अब्दुल मुनाफ शेख (४३, रा. जुना बोदवड रोड, चाळीस मोहल्ला, जामनेर), शकील अहमद सलीमुद्दीन शेख (४२, रा. प्लॉट नं. १३, मदने नगर, जामनेर) आणि मोहम्मद वसीम अब्दुल गफ्फार (४२, रा. इस्लामपुरा, जामनेर, जळगाव) यांना वेगवेगळ्या दिवशी अटक करण्यात आली.

न्यायालयाने तनय महाजन, नरेंद्र महाजन, शोएब अहमद अब्दुल सत्तार शेख आणि अब्दुल रईस अब्दुल मुनाफ शेख यांना १७ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तर उर्वरित शकील शेख आणि मोहम्मद गफ्फार या दोघांना शुक्रवारी रात्री अटक करण्यात आली.

संशयितांनी कुंभमेळ्याच्या कामांसंदर्भात बनावट यादी, भारत सरकारच्या राजमुद्रेसह बनावट कागदपत्रे, बनावट डिजिटल स्वाक्षऱ्या तसेच नाशिक महानगरपालिकेच्या टेंडर नोटीसचा गैरवापर करून बनावट आदेश तयार केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. त्यानंतर तक्रारदाराचा विश्वास संपादन करून हाऊसकीपिंग व इतर कामांच्या वर्क ऑर्डर मिळवून देण्याचे खोटे आश्वासन दिले होते.

या प्रकरणात मोठ्या प्रमाणावर आर्थिक फसवणूक झाल्याने पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी संशयितांचा तात्काळ शोध घेण्याचे आदेश दिले होते. या गुन्ह्यातील इतर आरोपींचा सहभाग, बनावट कागदपत्रांची निर्मिती, डिजिटल स्वाक्षऱ्या, आर्थिक व्यवहार तसेच फसवणुकीतील रकमेचा प्रवास याबाबत सखोल तपास सुरू असल्याचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.