Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

'१७ ऑगस्टपर्यंत सर्वांना अनेक घडामोडी बघाव्या लागतील, तोपर्यंत पुलाखालून बरंच पाणी वाहून जाईल'

'१७ ऑगस्टपर्यंत सर्वांना अनेक घडामोडी बघाव्या लागतील, तोपर्यंत पुलाखालून बरंच पाणी वाहून जाईल'

पुणे : खरा पंचनामा 

देशाच्या राजकारणात सध्या मतदारसंघ पुनर्रचनेचा मुद्दा चांगलाच तापला आहे. संसदेत हे विधेयक पुन्हा एकदा पटलावर येण्याची शक्यता असून, केंद्रातील मोदी सरकारला एनडीएबाहेरच्या खासदारांचाही पाठिंबा मिळत असल्याने त्यांची स्थिती भक्कम मानली जात आहे.

यातच सोमवारी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आठ खासदार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार असल्याने राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढवले जात आहेत. यापूर्वी खासदार सुप्रिया सुळे आणि स्वतः शरद पवार यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. या पार्श्वभूमीवर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी अत्यंत सूचक विधान केले आहे. '१७ ऑगस्टपर्यंत सर्वांना अनेक घडामोडी बघाव्या लागतील, तोपर्यंत पुलाखालून बरंच पाणी वाहून जाईल,' असे मोठे विधान रोहित पवार यांनी केलं आहे. पुण्यात माध्यमांशी संवाद साधताना रोहित पवार यांनी विविध राजकीय मुद्द्यांवर आपली स्पष्ट भूमिका मांडली.
डिलिमिटेशन विधेयकाबाबत बोलताना रोहित पवार म्हणाले की, "संसदेत हे विधेयक आल्यावर कोण कोणाच्या बाजूने उभे राहते आणि कोण गैरहजर राहते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. आमचे खासदार पंतप्रधानांना भेटणार असले, तरी ही भेट केवळ शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून असल्याचे पक्षाकडून सांगण्यात आले आहे. मुख्यमंत्र्यांची वेळ मिळायला दहा दिवस लागतात, पण पंतप्रधानांची वेळ लगेच कशी मिळते? असा खोचक सवालही त्यांनी उपस्थित केला.
आपली भूमिका नेहमीच स्पष्ट असते, असे सांगत रोहित पवार यांनी विश्वास व्यक्त केला की, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे सर्व खासदार या डिलिमिटेशन विधेयकाच्या विरोधातच मतदान करतील. कोणीही खासदार मतदानाला गैरहजर राहणार नाही. सध्या डिलिमिटेशनच्या नावाखाली अधिकाऱ्यांना हाताशी धरून मतदारसंघांची मोडतोड करण्याचे काम सुरू आहे. जर लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघांची अशा प्रकारे तोडफोड केली गेली, तर देशात लोकशाहीच शिल्लक राहणार नाही, असा संताप रोहित पवार यांनी व्यक्त केला.

काँग्रेसकडून सुनेत्रा पवार यांच्यावर करण्यात आलेल्या 'गुंगी गुडिया' या टीकेबाबत विचारले असता रोहित पवार म्हणाले की, "विरोधकांच्या टीकेकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहणे गरजेचे आहे. तुमच्याकडे राज्याचे उपमुख्यमंत्रिपद असताना त्या मात्र, पत्रकार परिषदेत त्यांच्याच पक्षाचे नेते स्वतःला पक्षाध्यक्ष समजून वावरतात आणि पत्रकारांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करतात, हे चुकीचे आहे. सुनेत्रा पवार यांनी आपल्या पदाचा वापर करत आक्रमक भूमिका मांडावी, अशी अनेकांची अपेक्षा आहे. परंतु, त्यांच्याच पक्षाचे नेते त्यांना बोलू देत नाहीत की त्यांचा काही वेगळा प्रोटोकॉल आहे, हे समजत नाही," असा टोला त्यांनी लगावला.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.