शाळेच्या पाहाणीसाठी गेलेल्या CJP च्या कार्यकर्त्यांना मारहाण, शाळेच्या बाहेर मोठा राडा
जयपूर : खरा पंचनामा
राजस्थानची राजधानी जयपूरमधील बगरू परिसरातील रामपुरा-कंवरपुरा गावात सरकारी शाळेच्या मुद्द्यावरून मोठा राडा झाला. कॉकरोच जनता पार्टीने (CJP) आपल्या 'स्कूल ठीक करो' अभियानांतर्गत गावातील सरकारी शाळेची पाहणी करण्यासाठी कार्यकर्त्यांना पाठवले होते. मात्र, गावकऱ्यांनी या कार्यकर्त्यांचा विरोध करत त्यांना मारहाण केलीये. त्यानंतर CJPचे प्रवक्ते आशुतोष रांका स्वतः शाळेत पोहोचले. त्यावेळी गावकऱ्यांनी त्यांच्या विरोधात घोषणाबाजी सुरू केली. काही वेळातच वातावरण तणावपूर्ण झाले आणि धक्काबुक्की सुरू झाली. आरोपानुसार, आशुतोष रांका यांच्यासह CJP कार्यकर्त्यांना मारहाण करण्यात आली आणि त्यांना गावातून हाकलून देण्यात आले.
या घटनेदरम्यान CJP कार्यकर्त्यांच्या वाहनांची तोडफोड करण्यात आली आणि गाड्यांच्या काचा फोडण्यात आल्या. कार्यकर्त्यांवर वाळू उडवण्यात आली तसेच दगडफेकही झाल्याचा आरोप आहे. CJPचे प्रवक्ते आशुतोष रांका यांनी सोशल मीडियावर आरोप केला की, त्यांच्या टीमसोबत असलेल्या कार्यकर्त्यांवर भाजपच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली. गावात आलेले लोक प्रत्यक्षात ग्रामीण नसून भाजपने बोलावलेले लोक असल्याचा आरोपही त्यांनी केला. या लोकांचा प्रमुख कमल प्रधान असून तो गरीबांच्या जमिनीवर कब्जा करण्याचे काम करतो, असा आरोप रांका यांनी केला. त्यांनी भाजपवर टीका करत, मुलांनी म्हशींच्या गोठ्यासारख्या ठिकाणी शिकत राहणे मान्य आहे; मात्र शाळा दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला तर ते मान्य नाही, असा आरोप केला. अभिजीत दिपके यांनीही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर प्रतिक्रिया देताना आशुतोष यांच्यावर राजस्थानमध्ये भाजपच्या गुंडांनी हल्ला केल्याचा आणि राजस्थान पोलिसांनी ते होऊ दिल्याचा आरोप केला.
दरम्यान, गावकऱ्यांनी शाळेच्या इमारतीच्या स्थितीबाबत आपली भूमिका मांडली. ग्रामीण विष्णु कुमार शर्मा यांनी सांगितले की, गावातील प्राथमिक शाळा पूर्वी पाचवीपर्यंत चालत होती आणि शाळेसाठी त्यांचे आजोबांनी जमीन दिली होती. 1999 मध्ये शाळेच्या इमारतीचे बांधकाम झाले होते. त्यानंतर इमारतीची दुरुस्ती झालेली नाही. आता इमारत इतकी खराब झाली आहे की, तेथे मुलांना बसून शिकणे शक्य नसल्याचे त्यांनी सांगितले. सध्या गावकऱ्यांनी एका मोठ्या इमारतीत दोन खोल्या उपलब्ध करून दिल्या असून, दोन शिक्षक सुमारे 20 ते 30 मुलांना शिकवत आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार, बगरू विधानसभा क्षेत्रात येणाऱ्या या भागासाठी आमदार डॉ. कैलाश वर्मा यांनी शाळेसाठी 9 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्याचे आश्वासन दिले होते, मात्र प्रत्यक्ष काम अद्याप सुरू झालेले नाही.
गावकरी राजेश कुमार शर्मा यांनी CJP कार्यकर्त्यांच्या गावात येण्याचा विरोध केला. शाळेच्या मुद्द्याचा राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला.
भारतात विरोध करण्याचा अधिकार आहे, मात्र आंदोलनाची पद्धत योग्य असावी, असे त्यांनी म्हटले. त्यांनी CJPवर राजकीय फायदा घेण्याचा आणि निधी गोळा करण्याचा आरोप केला.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.