'मराठी येत नाही? मग घ्या नोटीस !'
पहिल्याच दिवशी १,२६८ टॅक्सी-रिक्षा चालकांवर कारवाई; शिकण्यासाठी महिनाभराची मुदत
मुंबई : खरा पंचनामा
महाराष्ट्रात व्यावसायिक प्रवासी वाहने चालविणाऱ्या चालकांनाप्रवाशांशी थेट संवाद साधता यावा, यासाठी व्यवहारिक मराठी भाषेचे ज्ञान आता अनिवार्य करण्यात आले आहे. या नियमाची अंमलबजावणी करण्यासाठी परिवहन विभागाने गुरुवारपासून राज्यभर तपासणी मोहीम सुरू केली आहे. पहिल्याच दिवसाच्या तपासणीत व्यवहारिक मराठी येत नसलेल्या राज्यभरात १२६८ चालकांना नोटीस बजावण्यात आल्याची माहिती परिवहन विभागाने दिली आहे. मराठी न येणाऱ्या चालकांना सुधारणेसाठी एक महिन्याची संधी देण्यात आली आहे.
मोहीमेच्या पहिल्याच दिवशी मुंबई महानगर क्षेत्रात ३,९९५ वाहनचालकांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी ६०४ चालकांना व्यवहारिक मराठीचे पुरेसे ज्ञान नसल्याचे आढळून आले. या सर्वांना तात्काळ नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. उर्वरित राज्यातील आकडेवारीनुसार आतापर्यंत एकूण ४,२२२ चालकांची तपासणी झाली असून, त्यापैकी ६६४ चालकांना नोटिसा देण्यात आल्या आहेत.
परिवहन विभागाच्या माहितीनुसार, तीन टप्प्यात ही कारवाई केली जाणार असून, पहिल्या टप्प्यात तपासणीत मराठीचे ज्ञान नसल्याचे आढळल्यास चालकाला नोटीस दिली जाईल. दुसऱ्या टप्प्यात नोटीस मिळाल्यानंतर एका महिन्याच्या आत चालकाला व्यवहारिक मराठी शिकणे बंधनकारक असेल.
तिसऱ्या टप्प्यात मुदतीत मराठीचे ज्ञान सिद्ध न केल्यास संबंधित चालकाचा बॅज ३ महिन्यांसाठी निलंबित करण्यात येईल. ही तपासणी मोहीम ३० सप्टेंबर पर्यंत सुरू राहणार आहे. या कालावधीत सर्व व्यावसायिक वाहनचालकांची व्यवहारिक मराठीच्या ज्ञानासाठी तपासणी केली जाणार आहे.
महाराष्ट्रात व्यवसाय करून प्रवाशांशी थेट संवाद साधणाऱ्या व्यावसायिक वाहनचालकांना व्यवहारिक मराठी येणे ही केवळ नियमांची बाब नाही, तर ती प्रवाशांच्या सोयी-सुरक्षेशी संबंधित बाब आहे.
चालकांना मराठी शिकण्यासाठी पुरेसा कालावधी दिला जात आहे. मात्र दिलेल्या मुदतीनंतरही नियमाचे पालन न करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असे स्पष्ट मत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मांडले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.