Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

आता सर्वोच्च न्यायालय सर्वांनी गोळ्या झेलाव्यात अशी अपेक्षा करतंय का?CJP च्या अभिजीत दिपकेंचा सवाल

आता सर्वोच्च न्यायालय सर्वांनी गोळ्या झेलाव्यात अशी अपेक्षा करतंय का?
CJP च्या अभिजीत दिपकेंचा सवाल

नवी दिल्ली : खरा पंचनामा 

तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोइत्रा यांच्या याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने केलेली टिप्पणी सध्या राजकीय आणि कायदेशीर वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे. सोशल मीडियावरील वादग्रस्त पोस्टप्रकरणी दाखल गुन्ह्यात पोलिसांसमोर व्हर्चुअल (ऑनलाइन) हजर राहण्याची मागणी करणाऱ्या मोइत्रा यांना न्यायालयाने जोरदार दणका दिला.

न्यायालयाने "राजकारणात आल्यानंतर अंडी फेकण्याला कशाला घाबरता? आपल्या स्वातंत्र्यसैनिकांनी तर छातीवर गोळ्या झेलल्या होत्या" अशी टिप्पणी करत मोइत्रांची याचिका फेटाळण्याचे संकेत दिले होते, ज्यानंतर मोइत्रा यांच्या वकिलांनी ती याचिका मागे घेतली.

आता सर्वोच्च न्यायालयाच्या याच टिप्पणीवर पडसाद उमटायला सुरुवात झाली आहे. कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी या टिप्पणीवर आक्षेप घेत सर्वोच्च न्यायालयाच्या भूमिकेवरच सवाल उपस्थित केले आहेत.

सर्वोच्च न्यायालयाच्या टिप्पणीचा रोख धरत अभिजीत दिपके यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वर (ट्विटर) आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे. त्यांनी लिहिले आहे की, 'सर्वोच्च न्यायालय आता प्रत्येकाने गोळ्या झेलाव्यात अशी अपेक्षा करत आहे का? जेव्हा सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश विरोधकांच्या नेत्यांविरोधात अशा प्रकारची वक्तव्ये करतात, तेव्हा सर्वसामान्य माणसासाठी काय आशा उरते?' दिपके यांच्या या ट्विटमुळे न्यायालयाच्या भाषेवर आणि टिप्पणीच्या स्वरूपावर पुन्हा एकदा नव्या वादाला तोंड फुटले आहे.

तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोइत्रा यांच्याविरोधात पश्चिम बंगालमधील एका पोलीस ठाण्यात चिथावणीखोर वक्तव्य आणि धार्मिक भावना दुखवल्याप्रकरणी एफआयआर (FIR) दाखल आहे. या प्रकरणात कलकत्ता उच्च न्यायालयाने मोइत्रा यांना पोलीस तपासात सहकार्य करण्याचे आणि तपास अधिकाऱ्यासमोर प्रत्यक्ष हजर राहण्याचे निर्देश दिले होते.

मात्र, स्थानिक पातळीवर आपल्यावर विरोधी कार्यकर्त्यांकडून अंडी आणि टोमॅटो फेकले जाण्याची शक्यता आहे, तसेच यापूर्वीही असा प्रकार घडला असल्याचे सांगत मोइत्रा यांनी पोलिसांसमोर प्रत्यक्ष हजर न राहता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे (व्हर्चुअल) चौकशीला सामोरे जाण्याची परवानगी मागणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती.

दिपके यांनी येत्या स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील तरुण पिढीला विशेष संबोधित करावे आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी केंद्र सरकार कोणती ठोस पावले उचलत आहे, याची स्पष्ट माहिती द्यावी, ही नवी मागणी केली आहे. मध्यरात्री उशिरा 'एक्स' या समाजमाध्यमावर व्हिडिओ पोस्ट करत त्यांनी ही मागणी केली आहे.

सोशल मीडियावर एक व्हिडिओ सध्या वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये 'कॉक्रोच जनता पार्टी'चे संस्थापक अभिजीत दिपके त्यांच्या घरात आलेल्या एका पोलीस उपनिरीक्षकावर (PSI) संताप व्यक्त करताना दिसत आहेत.

व्हिडिओमध्ये ते संबंधित पोलीस अधिकाऱ्यावर आपल्या घरी भेटायला येणाऱ्या लोकांना पोलिसांकडून उद्धट वागणूक दिली जात असल्याचा आरोप करताना पाहायला मिळत आहेत. यावेळी अभिजीत दिपके यांनी संबंधित पोलीस अधिकाऱ्याला थेट घराबाहेर जायला सांगितले.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.