Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

'माझी FIR लिहून घ्या', पास हरवला म्हणून चिमुकला मित्रासह थेट ठाण्यात; बालकाचे धाडस पाहून पोलीसहीही थक्क

'माझी FIR लिहून घ्या', पास हरवला म्हणून चिमुकला मित्रासह थेट ठाण्यात; बालकाचे धाडस पाहून पोलीसहीही थक्क

वर्धा : खरा पंचनामा 

शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये, असे म्हणतात. तसेच पोलिसांपासून लांब असलेलेच बरे, असेही म्हटल्या जाते. म्हणून पोलीस तक्रार करण्यापेक्षा आपसात वाद निपटवून टाकू, अशी भावना दिसून येते. पण काही प्रसंगी पोलीस ठाणे गाठावेच लागते. मोबाईल चोरी किंवा हरवल्याची तक्रार करावीच लागते. किंवा वस्तू गहाळ झाली की त्याची अधिकृत नोंद म्हणुन पोलिसांकडे फिर्याद होतेच. पण हे सर्व सज्ञान व्यक्तीच करतो. पण शाळकरी मुलं ठाण्यात दिसणार नाही. आता हा त्यास अपवाद. दोन शाळकरी मुलं पोलीस ठाण्याच्या पायरीवर पोहचले आणि पोलीस पण थक्क झाले.

हिंगणघाट तालुक्यातील परडा या गावातल्या डॉ. बी. आर. आंबेडकर विद्यालय या शाळेतील हे विद्यार्थी. या शाळेत ९ व्या वर्गात शिकणारा समर्थ अनिल महाकाळकर याचा बससेवेचा विद्यार्थी पास हरवला होता. त्याची अधिकृत पोलीस तक्रार झाल्याशिवाय त्यास दुसरा पास मिळणार नाही, असे सांगण्यात आले. तो घाबरला. करावे काय, असा प्रश्न पडला. शेवटी त्याने आपल्या वर्गमित्रास सोबत घेत हिंगणघाट पोलीस ठाणे गाठले.

हे दोघे ठाण्यात पोहचले तेव्हा पोलीस स्टेशन डायरी सांभाळणारे अंमलदार राकेश आष्टणकर यांच्या नजरेस हे गोंधळळेल्या अवस्थेतील बालक दिसले. त्यांनी जवळ बोलावून त्यांची विचारपूस केली. कशाला आलात, अशी विचारणा केली तेव्हा यांनी आपबीती सांगितली. मित्राने स्पष्ट केले की या माझ्या सोबत्याची समर्थचा बस पास हरवला आहे. तक्रार केल्याशिवाय दुसरी पास मिळणार नाही.

अंमलदार आष्टणकर यांनी तक्रार कशी द्यायची हे समजावून सांगितले. घाबरू नका, मी सांगतो तसे करा, असा धीर दिला. तक्रार झाल्यावर त्यास एसटी पास हरविल्याचा दाखला दिला. तसेच नवी पास कशी काढायची याची प्रक्रिया पण समजावून सांगितली. हे आटोपले तेव्हा दोघा चिमुरड्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले. बस स्थानक प्रमुख संजय शेडमाके हे सांगतात की विद्यार्थी समर्थ याने पास हरवला असे सांगितले होते. तेव्हा त्यास पोलिसांना माहिती देण्याची सूचना करण्यात आली होती. १९८८ चे पास संदर्भातील परिपत्रक आहे. त्यानुसार विद्यार्थीच नव्हे तर आमच्या एस टी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांची पण पास हरवला तर त्यांनाही पोलीस तक्रार द्यावीच लागते. उपविभागीय पोलीस अधिकारी सुशील कुमार नायक म्हणतात की मुलांचे कौतुकच आहे. त्यांनी आपले संकट स्वतः पोलिसांना सांगितले. त्याचे त्वरित निराकरण करण्यात आले. नागरिकांनी सुद्धा न घाबरता आपली तक्रार दिली पाहिजे. समस्या दूर होण्यास मदत होते.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.