५.८० लाखांच्या मुद्देमालासह ४ किलो गांजा जप्त : रेकॉर्डवरील आरोपी जाळ्यात
सांगलीत LCB ची मोठी कारवाई

पूजा फडके 
सांगली : खरा पंचनामा 

सांगली जिल्ह्यात अमली पदार्थांची विक्री आणि तस्करी करणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा (LCB) आणि सांगली ग्रामीण पोलीस ठाण्याने संयुक्तरित्या मोठी कारवाई करत रेकॉर्डवरील एका सराईत आरोपीला अटक केली आहे. त्याच्याकडून तब्बल ४ किलो १६३ ग्रॅम गांजा आणि हुंडाई आय-२० (Hyundai i20) कार असा एकूण ५,८०,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सांगली जिल्ह्यातील नशेखोरी व अमली पदार्थांच्या तस्करीवर अंकुश ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी एलसीबीला (LCB) विशेष मोहीम राबवून कडक कारवाईचे निर्देश दिले होते.

त्यानुसार, एलसीबीचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत निशाणदार यांच्या पथकातील पोलीस अंमलदार विक्रम खोत यांना गोपनीय बातमीदाराकडून खबर मिळाली की, कवठेपिरान येथील रेकॉर्डवरील आरोपी सचिन चव्हाण हा त्याच्या हुंडाई आय-२० कारमधून गांजा विक्रीसाठी लक्ष्मी फाटा ते कवठेपिरान रस्त्यावरील महालक्ष्मी मंदिरा जवळ येणार आहे.

माहिती मिळताच पोलिसांनी महालक्ष्मी मंदिर परिसरात तात्काळ सापळा रचला. रस्त्याच्या कडेला संशयित राखाडी रंगाची कार येऊन थांबताच, पोलिसांनी क्षणाचाही विलंब न लावता चारी बाजूंनी वेढा घालून चालकाला ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्या इसमाकडे विचारपूस केली असता त्याने आपले नाव सचिन दादासो चव्हाण (वय ३५, रा. गांधीनगर, कवठेपिरान, ता. मिरज, जि. सांगली) असे सांगितले.

पंचांसमक्ष त्याच्या वाहनाची (आय-२० कार) झडती घेतली असता, कारच्या डिगीमध्ये पांढऱ्या प्लास्टिक पिशवीत ४ किलो १६३ ग्रॅम वजनाचा तयार गांजा (किंमत रु. १,८०,०००/-) मिळून आला. अधिक चौकशी केली असता, हा गांजा त्याने जास्त दराने विक्री करण्यासाठी आणल्याची कबुली दिली.

पोलिसांनी घटनास्थळावरून
 गांजा: ४ किलो १६३ ग्रॅम (किंमत रु. १,८०,०००/-), चारचाकी वाहन: राखाडी रंगाची हुंडाई आय-२० (किंमत रु. ४,००,०००/-)
एकूण ५,८०,०००/- रुपये मुद्देमाल जप्त केला आहे.

याप्रकरणी त्याच्या विरोधात सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात एन.डी.पी.एस. (NDPS) कायद्याचे कलम ८(क), २०(ब) ii(ब), २९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी सचिन चव्हाण हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून यापूर्वीही त्याच्यावर शरीराविरुद्धचे तसेच अमली पदार्थ कायद्यांतर्गत गुन्हे नोंद आहेत.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.