पॉक्सो प्रकरणात २० हजारांची लाच घेताना पोलीस उपनिरीक्षक एसीबीच्या जाळ्यात
नाशिक : खरा पंचनामा
मुलाविरुद्ध पॉक्सो कायद्यांतर्गत दाखल गुन्ह्यात आई-वडिलांना आरोपी करण्याची धमकी देत तसे न करता मदत करण्यासाठी २० हजार रुपयांची लाच स्वीकारताना पोलीस उपनिरीक्षकासह एका खासगी व्यक्तीला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात ताब्यात घेतले.
सुरगाणा पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत शिवाजी दवंगे (वय ५७, तारा निवास, साईनगर, पिंपळगाव बसवंत, ता. निफाड) आणि खासगी व्यक्ती इब्राहिम करीम वाणी (वय २८, जामुनमाथा, भोरमाळ, ता. सुरगाणा) अशी संशयितांची नावे आहेत. तक्रारदाराच्या मुलाविरुद्ध सुरगाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात पॉक्सो कायद्याची कलमे वाढवून त्याला अटक करण्यात आली होती. त्यानंतर तो कारागृहात होता. पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत दवंगे यांनी १९ जून २०२६ रोजी तक्रारदारास पोलीस ठाण्यात बोलावून दिवसभर बसवून ठेवले. तक्रारदार व त्यांच्या पत्नीला गुन्ह्यात आरोपी करण्याची धमकी देत, आरोपी करायचे नसल्यास आणि या गुन्ह्यात मदत करण्यासाठी ५० हजार रुपयांची लाच मागितली.
या संदर्भात तक्रार प्राप्त झाल्यानंतर पंचांसमक्ष पडताळणी करण्यात आली. त्यावेळी उपनिरीक्षक दवंगे आणि तक्रारदार यांच्यात या संदर्भात चर्चा झाली. पंचांसमक्ष ५० हजार रुपयांच्या लाचेची मागणी करून तडजोडीअंती २० हजार रुपये स्वीकारण्याचे मान्य करण्यात आले. त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचला. २१ आणि २४ जून रोजी तक्रारदारास लाचेची रक्कम देण्यासाठी पाठविण्यात आले. मात्र, उपनिरीक्षक दवंगे बाहेर असल्याने त्यांची भेट झाली नाही. त्यानंतर ३० जून रोजी पंचांसह तक्रारदारास लाच देण्यासाठी पाठविण्यात आले असता, उपनिरीक्षक दवंगे यांनी लाचेची रक्कम स्वीकारण्यास टाळाटाळ केली.
त्यानंतर दुसऱ्या दिवशी पुन्हा तक्रारदारास लाचेची रक्कम देण्यासाठी पाठविण्यात आले. त्यावेळी उपनिरीक्षक दवंगे यांनी लाचेची रक्कम सुरगाणा पोलीस ठाण्याच्या जुन्या इमारतीकडे जाणाऱ्या रस्त्यावरील किराणा दुकानात काम करणारा खासगी व्यक्ती इब्राहिम वाणी याच्याकडे देण्यास सांगितले. वाणी याच्यामार्फत उपनिरीक्षक दवंगे यांनी २० हजार रुपयांची लाच स्वीकारल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिली. या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत दवंगे आणि खासगी व्यक्ती इब्राहिम वाणी या दोघांविरुद्ध सुरगाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.