अँटिलिया स्फोटके' प्रकरणाचा मास्टरमाईंड परमबीर सिंह?
अनिल देशमुखांचा गंभीर दावा, NIAलाही थेट सवाल
मुंबई : खरा पंचनामा
उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील 'अँटिलिया' निवासस्थानाबाहेर स्फोटके ठेवण्याच्या गाजलेल्या प्रकरणावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पुन्हा एकदा तत्कालीन मुंबई पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वरील पोस्टमध्ये देशमुख यांनी या प्रकरणाचा मास्टरमाईंड परमबीर सिंह असल्याचा दावा करत राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) वरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
अनिल देशमुख यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटले की, अँटिलिया स्फोटक प्रकरणात तत्कालीन मुंबई पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांची भूमिका संशयास्पद असल्याचे एटीएसच्या तपासात समोर आले होते. त्यामुळेच त्यांची मुंबई पोलिस आयुक्तपदावरून बदली करण्यात आली होती. त्यानंतर सूडबुद्धीनेच परमबीर सिंह यांनी आपल्यावर 100 कोटी रुपयांच्या कथित वसुलीचा आरोप केल्याचा दावाही त्यांनी केला.
अनिल देशमुख यांच्या मते, नंतर या प्रकरणाचा तपास NIA कडे गेल्यानंतरही तपासात परमबीर सिंह यांची भूमिका समोर आली होती. या कटाची आखणी मुंबई पोलिस आयुक्त कार्यालयातच झाली होती आणि त्याबाबत अनेक अधिकाऱ्यांच्या जबाबांमध्येही उल्लेख असल्याचा दावा त्यांनी केला.
याच संदर्भात देशमुख यांनी मुंबई उच्च न्यायालयातील निरीक्षणाचाही उल्लेख केला. या प्रकरणातील एका आरोपीला जामीन देताना न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे यांनी 'परमबीर सिंह यांना आरोपी का करण्यात आले नाही?' असा प्रश्न उपस्थित करत NIAच्या तपासावर ताशेरे ओढल्याचे देशमुख यांनी नमूद केले. "एवढे सर्व समोर आल्यानंतरही NIAने परमबीर सिंह यांना आरोपी का केले नाही?" असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
दरम्यान, अँटिलिया स्फोटक प्रकरण आणि व्यावसायिक मनसुख हिरेन हत्या प्रकरणात विशेष NIA न्यायालयाने शनिवारी माजी हिरेन हत्या प्रकरणात विशेष NIA न्यायालयाने शनिवारी माजी पोलिस अधिकारी सचिन वाझे आणि प्रदीप शर्मा यांच्यासह इतर आरोपींविरुद्ध आरोप निश्चित केले आहेत. या प्रकरणात हत्या तसेच बेकायदा कृत्ये (प्रतिबंध) कायदा (UAPA) अंतर्गत खटला चालवला जाणार आहे.
राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) कायद्यांतर्गत स्थापन विशेष न्यायालयाचे न्यायमूर्ती चकोर बाविस्कर यांनी आरोप निश्चित केले. यावेळी सचिन वाझे, प्रदीप शर्मा आणि इतर आरोपींनी न्यायालयात स्वतःला निर्दोष असल्याचे सांगितले. या प्रकरणातील इतर आरोपींमध्ये रियाझुद्दीन काझी, सुनील माने, विनायक शिंदे, आनंद जाधव, सतीश तिरुपती मोठकुरी, मनीष वसंतभाई सोनी, नरेश गौर आणि संतोष शेलार यांचा समावेश असून, काझी, माने आणि शिंदे हे माजी पोलिस कर्मचारी आहेत.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.