दिशा सालियनच्या वडिलांकडून आदित्य ठाकरे, अनिल देशमुखांना नोटीस; 500 कोटींची भरपाई अन् बिनशर्त माफीची मागणी !
मुंबई : खरा पंचनामा
दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतची माजी मॅनेजर दिशा सालियन हिच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणात आता एक नवी घडामोड समोर आली आहे. दिशा सालियनचे वडील सतीश सालियन यांनी शिवसेना (ठाकरे गट) नेते आमदार आदित्य ठाकरे आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना थेट कायदेशीर नोटीस बजावली आहे. या नोटीसद्वारे त्यांनी दोन्ही नेत्यांना 7 दिवसांच्या आत बिनशर्त जाहीर माफी मागण्याची मागणी केली असून तसे न केल्यास गंभीर कायदेशीर कारवाईला सामोरे जाण्याचा इशारा दिला आहे.
सतीश सालियन यांनी पाठवलेल्या कायदेशीर नोटीसमध्ये आदित्य ठाकरे आणि अनिल देशमुख यांच्याकडून तब्बल 500 कोटी रुपयांच्या नुकसानभरपाईची (मानहानी) मागणी करण्यात आली आहे. यासोबतच, दोन्ही नेत्यांनी मागितलेली ही बिनशर्त माफी सर्व प्रमुख वृत्तपत्रे, टीव्ही न्यूज चॅनेल्स आणि डिजिटल मीडिया माध्यमांमध्ये प्रसिद्ध करावी, अशी स्पष्ट अटही नोटीसमध्ये घालण्यात आली आहे.
आदित्य ठाकरे यांनी सतीश सालियन यांची आपल्या मुलीच्या न्यायासाठी चाललेली धडपड ही राजकीय हेतूने प्रेरित असल्याचे चुकीचे चित्र उभे केले, असा थेट आरोप या नोटीसमध्ये करण्यात आला आहे. दिशा सालियन प्रकरणात आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी सीबीआयने (CBI) यापूर्वीच तपास करून क्लीन चिट दिल्याचा दावा केला होता. मात्र, 2 सप्टेंबर 2026 रोजी मुंबई हायकोर्टात सीबीआयने यापूर्वी असा कोणताही तपास केला नसल्याचे स्पष्ट केले आहे.
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी 23 मार्च 2025 रोजी हे प्रकरण आदित्य ठाकरेंना बदनाम करण्याचे षडयंत्र असल्याचे वक्तव्य केले होते. या वक्तव्यामुळे सतीश सालियन यांच्या सामाजिक प्रतिष्ठेला, विश्वासार्हतेला आणि चारित्र्याला मोठा धक्का पोहोचल्याचा आरोप करण्यात आला आहे. दोन्ही नेत्यांनी केलेले आरोप पूर्णपणे खोटे, बदनामीकारक आणि जनतेची दिशाभूल करणारे असल्याचा दावा सतीश सालियन यांनी केला आहे.
मुंबई हायकोर्टाने सतीश सालियन यांच्या याचिकेवर एफआयआर नोंदवणे आणि सीबीआय तपासाचे निर्देश दिले असल्याचा उल्लेख या नोटीसमध्ये करण्यात आला आहे. जर पुढील 7 दिवसांत या नोटीसमधील सर्व मागण्या पूर्ण केल्या नाहीत, तर दिवाणी नुकसानभरपाईच्या दाव्यासह इतर कठोर कायदेशीर पावले उचलली जातील. तसेच मानहानीप्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या कलम 356 अंतर्गत फौजदारी कारवाई करण्याचा पूर्ण हक्क राखून ठेवल्याचेही सतीश सालियन यांनी या नोटीसमध्ये नमूद केले आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.