त्यांना माफ करणं कठीण जातं... सुशांतचं पोस्टमार्टम करणाऱ्याचे 6 वर्षांनी खळबळजनक खुलासे, बहिणीचे गंभीर आरोप
मुंबई : खरा पंचनामा
दिवंगत बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याची बहीण श्वेता सिंग कीर्ती हिने भावाच्या मृत्यूशी संबंधित केलेल्या नवीन आरोपांमुळे पुन्हा एकदा चर्चेचा धुरळा उडाला आहे. अटलांटा येथील मेडिटेशन शिबिरानंतर आपल्या कारमधून रेकॉर्ड केलेल्या एका व्हिडिओमध्ये श्वेताने काही गंभीर आरोप केले आहेत.
सहा वर्षापूर्वी जो रिपोर्ट समोर आला होता, त्यात सुशांतच्या मृत्यू प्रकरणात काहीही संशयास्पद नसल्याचं नमूद होतं, मात्र पोस्टमार्टम करणाऱ्या व्यक्तीने सुशांतसोबत घातपात झाल्याचं आता सुचवलं, असं श्वेता म्हणाली.
श्वेताने सुशांत सिंग राजपूतच्या शवविच्छेदनाशी संबंधित काही तपशील उघड केले आहेत. "आम्हाला नुकतंच समजलं की ज्या व्यक्तीने 'भाई'चं शवविच्छेदन केलं होतं, तिने सांगितलं की त्याच्यावर 'स्टन गन'चा वापर करण्यात आला होता" असं म्हणत तिने मानेकडे निर्देश केला. "त्याचा पाय मोडला होता आणि त्याच्यावर अतिबळाचा वापर करण्यात आला होता. त्याच्या डोळ्यांनाही दुखापत झाली होती." असंही श्वेता म्हणाली.
आपल्या प्रिय व्यक्तीसोबत काही अघटित घडतं, तेव्हा त्यांना माफ करणं किती कठीण असतं, याची जाणीव व्यक्त करताना ती म्हणाली, "आपल्या प्रिय व्यक्तीसोबत असं काही घडण्याचा विचार करणंही कसं असतं, हे मला माहित आहे. जेव्हा एखादी गोष्ट स्वतःसोबत घडते, तेव्हा तुम्ही कदाचित माफ करु शकता. पण जेव्हा ती तुमच्या जीवलग व्यक्तीसोबत घडते, तेव्हा त्यांना माफ करण्यासाठी खूप जास्त धैर्याची गरज असते." असं श्वेता म्हणाली.
ध्यानधारणा केल्यानंतर शिबिरातून नुकतीच बाहेर पडलेली श्वेता पुढे म्हणाली, "पण बघा, मला द्वेष, सूड किंवा नाराजीच्या भावनेत अडकून राहायचं नाही. मला वाटतं की प्रेम, श्रद्धा, चांगुलपणा आणि ईश्वर यांच्या बाजूने उभे राहणे हाच माझ्या आयुष्याचा उद्देश आहे. आणि जगात ज्या नकारात्मकतेशी मी लढत आहे, तिला मी माझ्या मनावर कधीही ताबा मिळवू देणार नाही." असा निर्धारही श्वेताने व्यक्त केला.
श्वेताने लोकांना देव किंवा चांगुलपणावरील श्रद्धा हरवून न बसण्याचं आवाहन केलं. चाहत्यांसमोर आपली भूमिका मांडताना श्वेता म्हणाली, "कदाचित देवाने मला अशा परिस्थितीत ठेवलं आहे, जेणेकरुन मी ईश्वराची शक्ती आणि सामर्थ्य यांचं उदाहरण बनू शकेन. तुम्ही लोकांनी देव किंवा चांगुलपणावरील विश्वास गमावावा, असं मला वाटत नाही. कृपा करुन देवावरील श्रद्धा डळमळीत होऊ देऊ नका." असं आवाहन श्वेताने केलं.
"जगात अन्याय आहे. ठीक आहे, मी ते मान्य करते. कदाचित चांगल्या लोकांना खूप वेदनांतून जावे लागते. पण वेदना हाच परिवर्तनाचा मार्ग आहे" असंही श्वेता म्हणाली. व्हिडिओ मेसेजच्या अखेरीस श्वेता म्हणते, "तुमच्या मनाला नकारात्मकतेने ग्रासू देऊ नका. आणि प्रेमातून जखमा भरुन काढण्याची ताकद येते. मी प्रेमाची बाजूने ठाम उभी आहे. मला आशा आहे की प्रेम, ईश्वर आणि चांगुलपणासाठी तुम्हीही माझ्यासोबत उभे राहाल."
"मी पुन्हा सांगतेय, न्यायासाठी किंवा योग्य गोष्टीसाठी लढा देऊ नका असे मी म्हणत नाहीये. मी फक्त इतकंच म्हणतेय की, हा लढा सूडाच्या भावनेतून नाही, तर प्रेमाच्या भावनेतून लढला जावा." असं आवाहन श्वेताने केलं.
३४ वर्षीय सुशांत सिंग राजपूत १४ जून २०२० रोजी मुंबईतील वांद्रे येथील त्याच्या राहत्या अपार्टमेंटमध्ये गळफास घेतलेल्या अवस्थेत मृत आढळला होता. नव्या दाव्यांच्या अगदी उलट, जून २०२० मधील 'इंडिया टुडे'च्या एका अहवालात असे म्हटले होते की, सुशांत सिंग राजपूतचा प्राथमिक शवविच्छेदन अहवाल तीन डॉक्टरांनी दिला होता, परंतु अंतिम अहवालावर पाच डॉक्टरांच्या स्वाक्षऱ्या होत्या. या अहवालानुसार, त्याच्या मृत्यूमध्ये कोणताही संशयास्पद प्रकार आढळला नाही. "सुशांत सिंग राजपूतच्या शरीरावर झटापटीच्या खुणा किंवा बाह्य जखमा नव्हत्या. त्याची नखे स्वच्छ होती" असे अहवालात नमूद करण्यात आले होते आणि हे स्पष्टपणे 'आत्महत्येचे प्रकरण' असल्याचे म्हटले होते.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.