मराठा आरक्षणाचा तिढा सुटला? वर्षावर मध्यरात्री उशिरापर्यंत खलबतं, बैठकीत काय ठरलं, समोर आली मोठी अपडेट
मुंबई : खरा पंचनामा
उपोषणावर असलेले मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिलेला अल्टिमेटम, मराठा आरक्षणाचा पेटलेला मुद्दा आणि दुसरीकडे आक्रमक झालेले ओबीसी आंदोलन या दोन्ही संवेदनशील प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी काल सोमवारी रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 'वर्षा' या शासकीय निवासस्थानी बैठक पार पडली.
रात्री ११ वाजण्याच्या सुमारास सुरू झालेली ही महत्त्वाची बैठक तब्बल तीन तास चालली. मध्यरात्री २ वाजेपर्यंत झालेल्या बैठकीत मराठा आणि ओबीसी आरक्षणावर खलबते झाली असल्याची माहिती समोर आली आहे.
वर्षावरील बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, उद्योगमंत्री उदय सामंत, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि आमदार प्रसाद लाड आदी प्रमुख नेते उपस्थित होते.
मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या मागण्यांसाठी सरकारला दिलेला अल्टिमेटम आणि ओबीसी समाजानेही आपल्या मागण्यांसाठी आंदोलन पुकारल्याने ही बैठक अत्यंत निर्णायक मानली जात आहे. बैठकीत प्रामुख्याने मनोज जरांगे यांच्या मागण्या आणि उपोषणावर तोडगा काढण्यासाठी सविस्तर चर्चा झाली.
मराठा समाजाला त्यांचा हक्क आणि न्याय देतानाच, ओबीसी समाजाच्या आरक्षणावर कोणत्याही परिस्थितीत गदा येणार नाही किंवा त्यांच्यावर अन्याय होणार नाही, या मुद्द्यावर सर्व नेत्यांचे एकमत झाल्याचे समजते. मध्यरात्री उशिरा संपलेल्या बैठकीनंतर आज राज्य सरकारचे शिष्टमंडळ मनोज जरांगे यांची भेट घेणार का, त्यांना कोणता प्रस्ताव पाठवणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, सोमवारी, राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेत, मराठा, मराठा-कुणबी विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना ओबीसी आरक्षणाचे लाभ मिळणार आहेत.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.