Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

सांगलीत पवनचक्कीच्या कॉपर व ॲल्युमिनियम तारा चोरी करणारी टोळी गनिमी काव्याने गजाआड; १४.७४ लाखांचा मुद्देमाल जप्त करत एलसीबीकडून ७ गुन्हे उघडकीस

सांगलीत पवनचक्कीच्या कॉपर व ॲल्युमिनियम तारा चोरी करणारी टोळी गनिमी काव्याने गजाआड; 
१४.७४ लाखांचा मुद्देमाल जप्त करत एलसीबीकडून ७ गुन्हे उघडकीस

पूजा फडके 
सांगली : खरा पंचनामा 

सांगली जिल्ह्यातील जत परिसरात पवनचक्कीमधील कॉपर केबल आणि ॲल्युमिनियमच्या विद्युत तारांची चोरी करणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने (LCB) पर्दाफाश केला आहे. पोलीस अधीक्षक तुषार दोशी आणि अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आलेल्या या मोहिमेत जत पोलीस ठाण्यातील तब्बल ७ चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले आहे. या धडक कारवाईत एका आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून त्याच्याकडून चोरीचा मुद्देमाल आणि गुन्ह्यात वापरलेली टाटा एस गाडी असा एकूण १४ लाख ७४ हजार २६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

याबाबत मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, जत परिसरात पवनचक्कीच्या केबल चोरीचे प्रमाण वाढल्याने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांनी सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत निशाणदार यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक तयार केले होते. ६ सप्टेंबर २०२६ रोजी पथकातील पोलीस अंमलदार सचिन कनप यांना खबऱ्यामार्फत एक विना नंबरप्लेटची टाटा एस गाडी चोरीचे साहित्य घेऊन विक्रीसाठी येणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी झुलेलाल मंदिर ते वुडलँड हॉटेल परिसरात सापळा रचला. तेथून जाणाऱ्या संशयित वाहनाला थांबवून पाहणी केली असता गाडीच्या हौद्यात ॲल्युमिनियम आणि कॉपर वायरचे गोल बंडल आढळून आले.

गाडीचालक लखन केशव शिंदे (वय २५, रा. विठ्ठलनगर, जत, जि. सांगली) याच्याकडे साहित्याबाबत विचारणा केली असता त्याने सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र, पोलिसांनी त्याला विश्वासात घेऊन सखोल चौकशी केली असता, तो व त्याचे साथीदार सोनू शिंदे आणि समर्थ उर्फ गुंडू मोरे (दोघे रा. जत) यांनी मिळून गेल्या वर्षभरापासून जत परिसरातील पवनचक्क्यांमधून तारांची चोरी केल्याची कबुली दिली. जत पोलीस ठाण्याच्या अभिलेखाची पडताळणी केली असता आरोपींनी केलेल्या या चोरीप्रकरणी आधीच ७ गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले.
कारवाईदरम्यान पोलिसांनी ८ लाख ५० हजार रुपयांच्या ॲल्युमिनियम कंडक्टर केबल व विद्युत तारा, १ लाख २३ हजार ५६० रुपयांची कॉपर केबल, ८१ हजार ९०० रुपयांची सबमर्सिबल केबल, ६८ हजार ८०० रुपयांचे कट पॉईंट चॅनेल आणि चोरीसाठी वापरलेली ३ लाख ५० हजार रुपयांची टाटा एस चारचाकी गाडी असा १४,७४,२६० रुपयांचा ऐवज जप्त केला.

ही यशस्वी कामगिरी पोलीस निरीक्षक संजीव झाडे, सपोनि प्रशांत निशाणदार, उपनिरीक्षक महादेव पोवार, अंमलदार सचिन कनप, सोमनाथ पतंगे, श्रीधर बागडी, अमर नरळे, संदीप पाटील, सतीश माने, मच्छींद्र बर्डे आणि सायबर पोलीस ठाण्याच्या टीमने केली असून, पुढील तपासासाठी आरोपी व जप्त मुद्देमाल जत पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.