नवनीत राणा यांची अटक वैधच; मुंबई पोलिसांचा मुंबई उच्च न्यायालयात दावा
मुंबई : खरा पंचनामा
हनुमान चालीसा पठण प्रकरणी माजी खासदार नवनीत राणा यांना करण्यात आलेली अटक पूर्णपणे कायदेशीर आणि वैध असल्याचा दावा मुंबई पोलिसांनी मुंबई उच्च न्यायालयात केला आहे. या प्रकरणी विस्तृत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले असून, पुढील सुनावणी आता २३ सप्टेंबर रोजी होणार आहे.
२०२२ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या 'मातोश्री' निवासस्थानाबाहेर हनुमान चालीसा पठण करण्याच्या घोषणा तत्कालिन खासदार आणि भाजप नेत्या नवनीत राणा तसेच त्यांचे पती आमदार रवी राणा यांनी केली होती. या प्रकरणावरून खार पोलिसांनी नवनीत राणा यांना ताब्यात घेऊन अटक केली होती. पोलिसांच्या या अटकेच्या कायदेशीरतेला आव्हान देणारी याचिका नवनीत राणा यांच्या वतीने उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. आज या याचिकेवर न्यायालयात सुनावणी पार पडली. सुनावणी दरम्यान मुंबई पोलिसांनी अटकेचे समर्थन करत ती कायदेशीर प्रक्रियेला धरूनच असल्याचा युक्तिवाद करत ती कायदेशीर प्रक्रियेला धरूनच असल्याचा युक्तिवाद केला.
न्यायमूर्ती शिवकुमार डिगे यांच्या एकलपीठाने हा आदेश दिला. भारतीय दंड संहितेच्या (आयपीसी) कलम १५३ (अ) (धार्मिक किंवा सामाजिक तेढ निर्माण करणे) अंतर्गत दाखल झालेला एफआयआर नक्की कधी नोंदवला गेला, याची तारीख आणि वेळ राज्य सरकारने प्रतिज्ञापत्रात स्पष्ट करावे. विशेष न्यायालयाने २०२४ मध्ये राणा दांपत्याचा दोषमुक्तीचा अर्ज फेटाळला होता. या निर्णयाला आव्हान देणाऱ्या पुनरीक्षण याचिकेवर सुनावणीदरम्यान न्यायालयाने हे निर्देश दिले.
राणा दांपत्याचे वकील रिझवान मर्चेंट यांनी न्यायालयात सांगितले की, "संबंधित एफआयआर २३ एप्रिल २०२२ रोजी सायंकाळी ५:२३ वाजता नोंदवला गेला. मात्र, खार पोलीस ठाण्याच्या 'स्टेशन डायरी'नुसार, पोलीस अधिकारी सायंकाळी ५:०३ वाजताच राणा दांपत्याला अटक करण्यासाठी पोलीस ठाण्यातून बाहेर पडले होते. म्हणजेच, ५:१५ च्या सुमारास पोलीस जेव्हा राणा यांच्या घरी पोहोचले, तेव्हा एफआयआर अस्तित्वातच नव्हता. अस्तित्वात नसलेल्या एफआयआरच्या आधारे अटक करण्यासाठी अधिकारी आरोपींच्या घरी जाऊ शकत नाहीत. पोलिसांनी कारवाई सुरू केल्यानंतर तब्बल २० मिनिटांनी एफआयआर नोंदवला गेला आहे."
सरकारी वकिलांनी या युक्तिवादाचा तीव्र प्रतिकार केला. २३ एप्रिल २०२२ रोजी दुपारी ४:३० वाजताच पोलिसांना या घटनेची माहिती मिळाली होती. तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर हनुमान चालीसा वाचली जाणार असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ एफआयआर नोंदवला होता. त्यानंतर सायंकाळी ५:०३ वाजता अधिकारी अटकेसाठी निघाल्याची नोंद स्टेशन डायरीत झाली. एफआयआर ऑनलाईन पोर्टलवर अपलोड करण्यास काहीसा विलंब झाल्याने त्यावर सायंकाळी ५:२३ ही वेळ दिसत असल्याचे सरकारी वकिलांनी स्पष्ट केले.
सुनावणीदरम्यान न्यायालयाने विचारले की, राणा दांपत्याने खरोखरच 'मातोश्री' बंगल्याला वेढा घातला होता का किंवा तिथे जाऊन हनुमान चालीसा पठण केले होते का? यावर वकील मर्चेंट यांनी 'नाही' असे उत्तर दिले. न्यायमूर्तीनी दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर, एफआयआर नोंदवण्याच्या वेळेबाबतची खरी स्थिती स्पष्ट करण्यासाठी राज्य सरकारला प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे आदेश दिले. या प्रकरणी भूमिका मांडण्यासाठी २३ सप्टेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली असून, पुढील सुनावणी २३ सप्टेंबर रोजी होणार आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.