मराठा आरक्षणावर छत्रपती शाहू महाराजांची मोठी प्रतिक्रिया; मनोज जरांगेंच्या पाठीशी ठाम उभे राहून थेट सरकारवर निशाणा
कोल्हापूर : खरा पंचनामा
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आंदोलनाची भूमिका घेतली आहे. अंतरवाली सराटी येथे उपोषण सुरू केल्यानंतर आता मुंबईत आंदोलन करण्यासाठी जरांगे पाटील राजधानीकडे निघणार आहेत. मुंबई पोलिसांनी आंदोलनाला परवानगी नाकारली असली तरी आझाद मैदानावर उपोषण करण्याच्या भूमिकेवर ते ठाम आहेत. या पार्श्वभूमीवर कोल्हापूरचे खासदार छत्रपती शाहू महाराज यांनी जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला आहे.
मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी आंदोलन करत आहेत. सरकारच्या भूमिकेमुळेच जरांगे पाटील यांच्यावर पुन्हा आंदोलन करण्याची वेळ आली असल्याची टीका छत्रपती शाहू महाराज यांनी केली.
समाजाच्या न्याय आणि हक्कांसाठी लढणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला सकल समाजाचा पाठिंबा असल्याचेही शाहू महाराजांनी स्पष्ट केले. मराठा समाजाच्या मागण्या कायदेशीर कसोटीवर टिकतील अशा पद्धतीने शासनाने त्यावर तातडीने आणि प्रभावीपणे कार्यवाही करावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
मराठा समाज गेल्या अनेक वर्षांपासून आरक्षणासह विविध मागण्या आणि सोयी-सुविधांसाठी लोकशाही मार्गाने आंदोलन करत आहे. राज्यात मोठ्या प्रमाणावर शांततामय मूक मोर्चे काढण्यात आले. त्याचबरोबर विविध तालुके आणि जिल्ह्यांमध्ये ठिय्या आंदोलनेही करण्यात आली.
या आंदोलनांचा पुढील टप्पा म्हणून मनोज जरांगे पाटील यांनी अनेक वेळा प्रदीर्घ उपोषणे केली आहेत. आंदोलने थांबवण्यासाठी शासनाकडून वेळोवेळी विविध आश्वासने देण्यात आली. मात्र, ही आश्वासने पूर्णपणे अंमलात आणण्यात शासन आणि प्रशासन अपेक्षेप्रमाणे यशस्वी ठरले नसल्याचा दावा शाहू महाराजांनी केला. याच कारणामुळे मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषण सुरू केल्याचे त्यांनी सांगितले.
मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला सकल मराठा समाजाने यापूर्वीही पाठिंबा दिला आहे. आता मुंबईतील प्रस्तावित आंदोलनालाही कोल्हापूर जिल्ह्यातील मराठा समाजाचा पाठिंबा असल्याचे छत्रपती शाहू महाराजांनी म्हटले आहे.
शासनाने पुढाकार घेऊन मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर कायदेशीर चौकटीत तोडगा काढावा आणि प्रभावीपणे कार्यवाही करावी, अशी मागणी त्यांनी केली.
दरम्यान, मुंबईत आझाद मैदानावर उपोषण करण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी प्रशासकीय पातळीवर पुन्हा प्रयत्न सुरू केले आहेत. मुंबई पोलिसांनी नियमांचे उल्लंघन, संभाव्य वाहतूक कोंडी आणि सार्वजनिक सुरक्षेचा मुद्दा उपस्थित करत त्यांच्या आंदोलनाला यापूर्वी परवानगी नाकारली होती.
मात्र, परवानगी नाकारल्यानंतरही जरांगे पाटील यांनी स्वतः पुढाकार घेत मुंबई पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना ईमेल पाठवला आहे. आझाद मैदानावर शांततापूर्ण पद्धतीने आंदोलन आणि उपोषण करण्याची परवानगी द्यावी, अशी विनंती त्यांनी नव्या अर्जातून केली आहे.
यापूर्वी त्यांच्या प्रतिनिधींकडून आंदोलनाच्या परवानगीसाठी अर्ज करण्यात आला होता. आता स्वतः जरांगे पाटील यांनी अधिकृत ईमेलद्वारे परवानगी मागितल्याने प्रशासनाच्या निर्णयाकडे लक्ष लागले आहे.
एकीकडे मुंबईतील आंदोलनाच्या परवानगीचा प्रश्न कायम असताना दुसरीकडे छत्रपती शाहू महाराजांनी दिलेल्या पाठिंब्यामुळे मराठा आरक्षण आंदोलनाला राजकीय पाठबळ मिळाल्याची चर्चा सुरू झाली आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.